21 जणांनी मिळून केला सुमारे 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सहकारातील आघाडीची पतसंस्था असलेली व आता सुमारे 80 कोटींच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या दुधगंगा पतसंस्थेतील घोटाळ्या प्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन, मॅनेजर यांच्यासह सुमारे 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर चार जणांना अटक देखील करण्यात आली होती. तर आज सोमवारी या पतसंस्थेचे मॅनेजर यांना देखील शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.
या पतसंस्थेत चेअरमन भाऊसाहेब कुटे व इतर 21 जणांनी मिळून सुमारे 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. दि. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 दरम्यान हा अपहार केल्याप्रकरणी लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी जिल्हापरिषद सदस्य व संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे (रा.गणपती मळा सुकेवाडी), मॅनेजर भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा. संगमनेर), यांच्या सह 21 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर लहानू गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमानाथ कारभारी सातपुते, अमोल क्षिरसागर यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. तर आज शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, पो. कॉ. लोखंडे व पोलीस कॉ. कर्पे या पथकांनी पतसंस्थेचे मॅनेजर भाऊसाहेब गुंजाळ यांच्या रहात्या घरातून त्यांना ताब्यात घेतले.
संस्थेचे लेखापाल राजेंद्र निकम यांनी दि. 1 एप्रिल 2016 पासून दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे फेरलेखापरीक्षण केले. यात संस्थेचे चेअरमन व मॅनेजर यांनी या संस्थेत मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे त्यांचे लक्षात आले. ठेवीदाराने केलेली पावतीची मुदत संपून देखील ती रक्कम ठेवीदारांना न देता बोगस सही करून रकमा काढण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून या पतसंस्थेत 80 कोटींचा घोटाळा करण्यात आला. यात चेअरमन भाऊसाहेब कुटे, मॅनेजर अकाऊंटट भाऊसाहेब गायकवाड यांचा थेट सहभाग असल्याचे आढळून आले. संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला.
दरम्यान संचालक मंडळाचा विरोध असताना कर्ज वाटप केले. संस्थेचे चेअरमन यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील अवैध कर्ज वाटप केले. व्यक्तीगत जहिरातीचा खर्च संस्थेच्या माथी मारला. बँक ओहरड्राफ कर्जात देखील अपहार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे यांनी संस्था आपल्या मालकीची असल्यासारखे वागले. त्यांनी वैयक्तीक खर्च महसुली खर्चात धरत 81 लाखांचा घोटाळा केला. असा एक तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार या संस्थेत 21 आरोपींनी मिळून केला. या संस्थेचत शेतकरी, मजुर, कामगार, छोटे मोठे व्यापारी यांचे करोडो रुपये अडकून पडले आहे. मात्र आता पदाधिकारी अटकेत तर काही फरार झाल्याने आपले पैसे कधी आणि कोण देणार अशी भ्रांत या ठेवीदारांना पडली आहे.