
नियमित परतफेड करणार्यांचे व्याज परत देणार
युवावार्ता (प्रतिनिधी)
अहमदनगर- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक विकास सेवा संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील नियमित कर्ज तीन लाखांपर्यंत कर्जावरील वसूल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.
15 ते 31 मार्च 2024 दरम्यान वसूल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत केले जाणार आहे. शासनाच्या सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पीक कर्जावरील रक्कम तीन लाखांपर्यंतचे व्याज वसूल न करण्याबाबतच्या सूचना सर्व जिल्हा बँकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बँकेने 28 जूनच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व सभासद प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याज वसूल न करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, प्राथमिक सेवा संस्थांनी त्यांना सदर परिपत्रक मिळण्यापूर्वी
नियमित पीक कर्ज परतफेड करणार्या शेतकरी सभासदांकडून पीक कर्जावरील व्याज वसूल केले होते. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 15 एप्रिल 2024 रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली आहे. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतीत पीक कर्ज नियमित भरणा केला आहे, अशा सभासदांना नियमानुसार खरीप पीक कर्ज त्वरित वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे यापुढे देखील जे शेतकरी सभासद मागील पीक कर्जाची परतफेड करतील, अशा सभासदांना देखील त्वरित कर्ज वितरीत करण्यात येईल.
