अकॅडमीच्या मुलांचे रस्त्यावरील फिरणे नागरिकांना त्रासदायक ?

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर
संगमनेर शहर सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी मध्यवर्ती असल्याने या शहरात बाहेरगावातील शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजार पटीत आहे. संगमनेर शहरात तंत्र शिक्षण, पदवी ते पीएच.डी पर्यंत तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, तंत्रनिकेतन, आयटीआय आणि इतर प्रशिक्षणाच्या सोयी असल्याने बाहेरील विद्यार्थ्यांची संख्या शहरास जड होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मागील वीस वर्षांपासून संगमनेर शहरात करिअर अकॅडमीच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे.
या करिअर अकॅडमीद्वारे पोलीस भरती, मिलिटरी भरती, स्पर्धा परीक्षा यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण देत असताना अनेक विद्यार्थी संपूर्ण शहरात मिळेल तेथे, मिळेल तसे राहत असतात. त्यांच्या खाण्याच्या आणि राहण्याच्या व्यवस्थेसाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी कामही करीत असतात. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी संगमनेर शहरातील व परिसरातील महाविद्यालयांमध्ये पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे. अनेक विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होत आहेत. संगमनेर शहरातील करिअर अकॅडमी हा व्यवसाय प्रसिद्धीस येत असताना ज्या अकॅडमी चालकांनी कायदेशीरबाबी पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी नियम व शिस्त लावून आवश्यक सुविधा दिलेल्या आहेत त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. मात्र करिअर अकॅडमीच्या नावाखाली व्यवसाय करीत असताना कोणत्याही प्रकारचा परवाना नाही किंवा अभ्यासिका चालवत असताना कोणत्याही प्रकारची नोंदणी नाही, विद्यार्थ्यांची नोंदणी नाही. या परिस्थितीत या शहरातील अकॅडमीच्या मुला-मुलींचे शहरात वावरणे नागरिकांसाठी त्रासदायक होत आहे.

विशेषतः सकाळी पाच पासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर, मोकळ्या ठिकाणी, सार्वजनिक संस्थांच्या मैदानावर हे विद्यार्थी वावरत असतात. करिअर अकॅडमीमधील अनेक विद्यार्थी घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने पूर्णवेळ शिक्षण घेणे शक्य नसते. कोणत्याही परिस्थितीत सरकारी नोकरी मिळावी या अपेक्षेने ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहत असतात. संगमनेरचे नागरिक त्यांना राहण्यासाठी भाड्यात सवलत देऊन किंवा खानावळीत सवलत देऊन सहकार्य करीत असतात.
परंतु काही विद्यार्थी अकॅडमी करीत असताना किंवा अकॅडमीच्या नावाखाली शहरात गैरकृत्य करीत असल्याचे समजले आहे. काही अकॅडमी चालकांचे वर्तनसुद्धा बेकायदेशीर आणि गैरकृत्य करणारे ठरल्याने संगमनेरमध्ये करिअर अकॅडमी हा व्यवसाय बदनाम होत आहे.
संगमनेरमधील सर्व करिअर अकॅडमीचे नियंत्रण, नोंदणी, निरीक्षण व तपासणी संगमनेर नगर परिषद आणि संबंधित शासकीय विभागांनी करणे अनिवार्य झालेले आहे. आजच्या स्थितीला किमान 5000 विद्यार्थी संगमनेर शहरात करिअर अकॅडमी शिक्षण घेत असताना त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा व अधिवासाचा त्रास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संगमनेरकरांना आणि नगरपालिकेस सहन करावा लागत आहे. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे भले होत आहे म्हणून या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले तर संगमनेरची शांतता धोक्यात येऊ शकते. काही नागरिकांनी याविषयी तक्रारीही केलेल्या आहेत. यानिमित्त आम्ही नगरपालिका प्रशासनास आवाहन करतो की, शहरातील परवाना नसलेले व्यवसाय बंद करावेत.

याचबरोबर नागरिकांनीही आपल्या परिसरात कोणतीही व्यक्ती गैरकृत्य करीत असेल तर त्याची माहिती पोलीस प्रशासनास द्यावी आणि संगमनेरची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्रशासनास सहकार्य करावे. संगमनेरमध्ये शांतता भंग करणार्या काही घटना घडत असतात. त्यामध्ये काही मिरवणुकांसाठी कर्णकर्कश डीजे वापरला जातो. या मिरवणुकांत सहभागी झालेले युवक-युवती बेहोश होऊन नाचतात आणि त्याचा त्रास वृद्ध नागरिकांना, लहान मुलांना व रुग्णांना, परिक्षार्थींना होत असतो. याची नोंद घेऊन संगमनेर शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी नगरपालिका व पोलीस यंत्रणेने अधिकृत नोंदणी नसलेल्या/असलेल्या आस्थापनांकडून गैरकृत्य झाल्यास त्यांना जाब विचारावा. दोषी व्यक्ती किंवा संस्थावर कायदेशीर कारवाई कारावी अशी संगमनेरकरांची अपेक्षा आहे.





















