
संगमनेर (प्रतिनिधी)
हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर संगमनेर पोलीसांनी शहरातील अनाधिकृत कत्तलखान्यांवर मोठी कारवाई करत हे कत्तलखाने जमीनदोस्त केले होते. परंतू त्यानंतरही छुप्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी हे कत्तलखाने सुरु होते. पोलीसांकडूनही छूटपुटची कारवाई केली जात होती. मात्र आज पहाटे शहर पोलीसांनी कोल्हेवाडी रोड येथील काटवनात सुरु असलेल्या अनाधिकृत कत्तलखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत 60 हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे गोमांस त्याचबरोबर गोमांस वाहतुकीसाठी असणारे वाहने तसेच तीन गोवंश गायी, एक वासरु असा सुमारे 11 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भारत नगर, कोल्हेवाडी रोड परीसर याठिकाणी आजही कत्तलखाने खुलेआम सुरु आहेत. पोलीस प्रशासनाची डोळेझाक करुन येथून मोठ्या प्रमाणावर गोमांस बाहेरील जिल्ह्यात पाठविले जाते. हिंदूत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर केलेल्या कारवाईमुळे शहरातील कत्तलखाने बंद झाले असा दावा पोलीसांकडून केला जात होता. परंतू कोल्हेवाडी रोड याठिकाणी असणार्या काटवनात अवैधपणे गोवंशाची कत्तल केली जात असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पहाटे चारच्या सुमारास त्यांनी पोलीस पथकासह याठिकाणी छापा मारला या छाप्यात या पथकाला 60 हजार रुपये किमतीचे 300 किलो गोमांस, 200 रुपयांची कुर्हाड, 200 रुपयांचे चाकू, 600 रुपयांचा वजनकाटा, 2 लाख रुपये किमतीचे छोटा हत्ती वाहन (क्रं. एम.एच.17, एजी 3016) व वाहनात 40 हजार रुपयांचे 200 किलो गोमांस, 2 लाख 50 हजार रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार, 2 लाख 20 हजार रुपये किमतीची छोटा हत्ती पिकअप, 3 लाख 30 हजार रुपये किमतीची महिंदा पिकअप 30 हजार रुपये किमतीची तीन गायी आणि 5 हजार रुपये किमतीचे वासरु असा एकूण 11 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी साहील उर्फ साद मुस्ताक कुरेशी (वय 19), सलीम मुस्ताक कुरेशी (वय 24) रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर यांच्यावर गुन्हा रजि. नं. 525/2022, भादंवि कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारीत कलम 5 (अ), 1, 9 (क) (अ) व कलम 3/11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. जाणे करत आहेत.
