![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/05/rajapur-842x1024.jpg)
ऐतिहासिक राजापूरची आधुनिक प्रगती…
राजापूर गावास अतिशय जूना इतिहास आहे. इ.स.1000 मध्ये राजापूर गावाची नोंद ’अर्जुननोंदीका’ अशी ऐतिहासिक दस्तऐवजात आढळते.
संगमनेरच्या पश्चिम दिशेला पाच किमी. असलेले राजापूर म्हाळुंगी नदीचे पश्चिम तीरावर वसले आहे. काळी कसदार जमीन व शेतकरी कष्टाळू असल्याने 100 वर्षांपूर्वी अतिशय समृध्द असलेले राजापूर दुष्काळात सापडले आणि शेती बरोबरच विडी वळण्याचा व्यवसाय राजापूरमध्ये सुरू झाला. वारंवार दुष्काळाने शेतीचे उत्पन्न कमी झाल्याने अशिक्षितपणाबरोबरच दारिद्रयही वाढत गेले आणि नाव राजापूर असले तरी ग्रामस्थांची परिस्थिती गरीबीची झाली.
पेशवाई संपून ब्रिटीश राजवट सुरू झाली. फोडा व झोडा धोरण वापरून ब्रिटीश सत्तेने पारतंत्र्याचा पाश आवळला आणि भारतीय संपत्तीचे शोषण केले. अन्यायी ब्रिटीश सत्तेविरुध्द भारतीय क्रांतिकारकांनी, नेत्यांनी जनतेला जागे केले, संघटीत केले. भारतीय काँग्रेस पक्षाबरोबरच कम्युनिस्ट विचारवंतांनी चळवळीत फार मोठे योगदान भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राजापूर नागरिक सक्रीय सहभागी असताना लढ्याचे नेतृत्व कॉ. रामभाऊ नागरे, कॉ. विष्णुबुवा हासे, कॉ. सहाणे मास्तर यांचेसह अनेक ग्रामस्थांनी संपूर्ण गाव क्रांतीमय बनविले. हा क्रांतीचा वारसा जागृत राहीला. 9 मार्च 1950 साली जुलमी धान्य लेव्ही कायद्याविरूध्द झालेल्या संघर्षात काशिनाथ कदम, मारूती गायकवाड, मुरलीधर गोलेकर हे तीन हुतात्मे झाले. आजही त्यांच्या बलीदानाची आठवण देणारे हुतात्मा स्मारक राजापूरमध्ये उभे आहे. दरवर्षी हुतात्म्यांना अभिवादन केले जाते.
स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळ कार्यान्वित झाली. सहकारातील जेष्ठ नेते भाऊसाहेब थोरातांनी जनतेच्या मदतीने जमिनीचे सपाटीकरण, सहकारी पाणीपुरवठा, खते व कृषि औजारांसाठी शेतकी सहकारी संघ, दुध व्यवसायासाठी संकरीत गायी, पशुवैद्यकीय केंद्रे याव्दारे संगमनेरमध्ये आधुनिक विकासाचा पाया धातला. राजापूर गावचे नागरिक त्यामध्ये सक्रीय सहभागी झाले. राजापूर ग्रामपंचायत व सहकारी सोसायटी बरोबरच राजापूरची पहिली म्हाळुंगेश्वर सह दुध संस्थेची स्थापना 1980 साली झाली, प्राथमिक शाळेनंतरच्या शिक्षणासाठी प्रागतिक शिक्षण संस्थेची स्थापना होऊन माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था 1981 साली झाली.
कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव असला तरी सहकार विकास कार्यात सहभागी झाल्याने राजापूरचे विश्वनाथ रामभाऊ नवले संगमनेर सह. साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदापर्यंत पोहचले. राजापूरचे प्रगतशिल शेतकरी मुरलीधर भिकाजी हासे, विश्वनाथ बाळाजी खतोडे हे साखर कारखान्याचे संचालक होते. आजही संतोष रखमाजी हासे कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.
राजापूर गावात शैक्षणिक सुविधा व्हाव्यात म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव येथील कॉलेजला प्राध्यापक असलेले प्राचार्य ग.स. सोनवणे, पाटबंधारे खात्यातील कार्यकारी अभियंता ल.ग. हासे, कॉ. सहाणे मास्तर, कॉ. विष्णू भिवा हासे, निवृत्ती रावजी गोडसे, प्रा. डॉ.के. पी. बैरागी, मारूती पुंजा हासे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ नवले यांनी राजापूर ग्रामस्थांच्या मदतीने अतिशय प्रयत्न केले. प्रागतिक शिक्षण संस्थेमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे बहिःस्थ शिक्षणाचे केंद्र राजापूरमध्ये सुरू करण्यासाठी या शिक्षणप्रेमी नागरिकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नास प्रागतिक शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षकवृंद व ग्रामस्थांची मोठी साथ मिळाल्याने संगमनेर तालूक्यातील ग्रामीण भागात पहिले महाविद्यालय सुरू करण्याचा मान राजापूरला मिळाला आहे. परिस्थितीनुरूप व वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी दुध संस्था, लोकविकास सह. पतसंस्था, धनलक्ष्मी पतसंस्था, स्वा. सै.बा.सा. देशमुख सह. पतसंस्था, इंदिरा महिला सह पतसंस्था, नव्याने स्थापन झालेली जनकल्याण सह. पतसंस्था, अहमदनगर जिल्हा सह. बँकेची राजापूर शाखा, आयडीबीआय या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा व एटीएम सुविधा निर्माण होऊन राजापूर सहकार, शिक्षण, शेती व व्यवसाय क्षेत्रात समृध्द झाले आहे.
![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/05/Hutatnma-smarak-218x1024.jpg)
ऐतिहासिक राजापूरची व क्रांतिकारक चळवळीची परंपरा लक्षात घेता राजापूर गावाची ठोस प्रगती होऊ शकली नाही याचे कारण राजकीय गट-तट व पक्षीय मतभेद हे असल्याचे नमूद करावे लागेल. एकमुखी नेतृत्त्व असलेले जवळे कडलग, मालदाड, साकूर या गावांची झालेली प्रगती व राजापूरची प्रगती तुलना करता अधिक होणे गरजेचे होते.
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पुणे येथील सेवानिवृत्त प्रा. डॉ. के.पी. बैरागी, एस. टी. खात्यातून सेवानिवृत्त झालेले विश्वनाथ गोसावी, बँकींग क्षेत्रातील वसंत व चंद्रकांत देशमुख बंधू, भारतीय अन्न महामंडळातील विठ्ठल भिकाजी नवले, अन्न व औषध विभागातील बादशहा भाऊ हासे या सारखे अनेक राजापूरचे ज्येष्ठ नागरिक आहेत. नवजीवन इंजिनिअरींग व नवले मशिनरीचे प्रकाश व बाळासाहेब नवले, सागर कृषि उद्योगाचे मुरलीधर हासे व बंधू, आनंद प्रिंटर्स, संगम संस्कृती व दैनिक युवावार्ताचे संस्थापक सौ. सुशिला व किसन भाऊ हासे, साई इलेक्ट्रीकल्सचे राजेंद्र देशमुख, सायली ट्रेडर्सचे रविंद्र देशमुख, अमित कृषि सेवा केंद्राचे योगेश हासे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विकास बाळाजी हासे, डॉ. भाऊसाहेब संपत हासे, डॉ. प्रमोद अर्जून हासे, वायुदलातील सेवानिवृत्त भारत व दत्तात्रय नवले बंधू, शिर्के शिपोरेस कंपनीचे प्रोजेट मॅनेजर शरद नवले, राजूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब यशवंत देशमुख, बँकींग क्षेत्रातील वैभव भाऊसाहेब हासे, प्रविण माधव हासे, पोलीस दलातील सुनिल गणपत हासे, नितीन रामनाथ सोनवणे, प्रविण तात्याराम कडलग बंधू, महसूल विभागात तहसिलदार सुधीर सातपुते, बाळासाहेब गोसावी, बाळासाहेब भाऊराव नवले, अरूण दशरथ हासे हे राजापूरचे नागरीक आहेत. नाशिकचे उद्योजक मुरलीधर भाऊराव नवले, बाळासाहेब सुकदेव हासे, ठाणे येथील आत्मा मलिक महाविद्यालयाचे प्राचार्य जालींदर यशवंत हासे, कृषी उद्योगात अग्रेसर असलेले राजापूरचे उद्योजक शरद बाळाजी हासे, श्री स्वामी समर्थ काँम्पूटर प्रशिक्षण केंद्र (सौ.ज्योती तुकाराम हासे), रमेश सोनवणे यांनी राजापूरच्या नावलौकिकात भर घातली आहे. तसेच वकिली, वैद्यकीय व सीए क्षेत्रात अनेक राजापूरकर कार्यरत आहेत. मुंबई क्राईम ब्रांच मधील सुनिल गणपत हासे, धनश्री एंटरप्राईजेसचे अमित रामननाथ हासे, पुणे येथील व्यावसायिक सतिष नामदेव हासे, विठाई मंगल कार्यालयाचे संचालक शशिकांत बापूसाहेब नवले, राईज मेटल क्राफ्टचे अजय विजय हासे, राईज कन्स्ट्रक्शनचे सुजय विजय हासे यांच्यासह अनेक उद्योजकांमुळे राजापूरला वेगळी ओळख मिळाली आहे. आार्थिक पारदर्शकता व काटकसरीने सहकार संस्थांची प्रगती वृध्दींगत होत आहे. राजापूर गावास क्रांतीचा, चळवळीचा व संघर्षाचा इतिहास आहे. लढावूपणाची परंपरा आहे. ही परंपरा पुढील पिढ्यामध्ये संक्रमीत करण्यासाठी प्रत्येक वर्षी 9 मार्च रोजी हुतात्मा दिनाचा कार्यक्रम सर्वांच्या सहमतीने साजरा होत असतो. ग्रामसंस्था, ग्रामस्थ आणि जून्या पिढीतील स्वातंत्र्य सैनिक, कम्युनिस्ट कार्यकर्ते यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम प्रभावी बनत आहे. यानिमित्त अनेक मान्यवर नेत्यांची व्याख्याने होतात. तसेच जीवन गौरव पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांना सन्मानीत केले आहे.
राजापूरचे सुपुत्र नितीन शिवाजी हासे यांनी सह्याद्री अॅग्रोव्हेटच्या माध्यमातून आपल्या व्यावसायाचा विस्तार संपूर्ण राज्यात केला आहे. आनंद व सुदीप किसन हासे यांनी युवा पॉलिप्रिंट अँड पॅकेजिंग इंडस्ट्रिजच्या माध्यमातून पॅकेजिंग क्षेत्रात नवीन क्रांती केली आहे.
आधुनिक युगातील राजापूर निर्माण करण्यासाठी स्थानिक गट-तट विसरून, राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थांनी एक होणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक कार्याची आवड असणार्या ग्रामस्थांनी आधुनिक राजापूरच्या विकासाचा मास्टर प्लॅन बनवून नियोजनबध्द विकास करणे महत्त्वाचे आहे. राजापूरच्या विकासकार्यास आर्थिक निधी कमी पडणार नाही मात्र त्यासाठी नियोजन, कार्यवाही, शासकीय योजनांचा पाठपुरावा, ग्रामस्थांचे सक्रीय सहकार्य तसेच राजापूरमधील उद्योजक आणि नोकरदारांचा सक्रीय सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. राजापूर विकासप्रेमी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही राजापूरकर फाऊंडेशन या नावाने समन्वय संघटन सुरू झाले असून प्राचार्य ग.स. सोनवणे, ल.ग. हासे, किसन भाऊ हासे, अॅड. कैलास लक्ष्मण हासे, बाळासाहेब नामदेव हासे, बाळासाहेब भिकाजी हासे, बाळासाहेब यशवंत सोनवणे, आर.डी. मामा हासे, प्रा. आनंदा गणपत हासे यांचेसह राजापूरच्या बाहेर असणारे संघटनप्रेमी नागरिक प्रयत्नशील आहेत. संगमनेरचा विस्तार राजापूरपर्यंत येऊन पोहचला आहे. राजापूरची सर्व शेती आता बागायत आहे. डाळींब, टोमॅटो, ऊस, भाजीपाला ही व्यापारी पिके घेतली जातात. शेतीमालावर प्रक्रिया करणारा तसेच शेतमाल साठवणूक करणारा उद्योग सहकारातून सुरू होणे गरजेचे. दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगासही संधी आहे. गावाशेजारी शासकीय आयटीआय आहे मात्र पॉलिटेक्निक सुरू केल्यास विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण घेणे अधिक सोईचे होईल. मालसाठवणूकीचे गोडाऊन व कोल्ड स्टोरेज व्यवसायही तरूणांना स्वावलंबनाची संधी देऊ शकेल.
आढळा धरणाचे पाणी राजापूर गावाच्या शेतीस मिळते. मात्र कॅनॉलचे शेवटचे टोक असल्याने बर्याच वेळा कॅनॉलचे पाणी राजापूरपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहतच नाही. टेल टू हेड अशी पाणी देण्याची पध्दत असूनही पाणी वापरणातील गैरव्यवस्थापनामुळे राजापूरच्या शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही त्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पाणी वापरातील त्रुटी व भ्रष्टाचार दूर करणे गरजेचे आहे. तसेच नदी वाहती करून नदीकाठची संस्कृती आणि जैवविविधता जीवंत केली पाहिजे. म्हाळुंगी नदीचा घाट, बहिरोबा मंदीर परिसर सुशोभिकरण, हुतात्मा स्मारक सुशोभिकरण, प्रागतिक शिक्षण संस्थेच्या इमारती, क्रीडांगण, सार्वजनिक हॉल व मंगल कार्यालय आत्याधुनिक व्यायाम केंद्र व समृध्द ग्रंथालय, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देणारे शासकीय संगणक महा ई. सेवा केंद्र, सौरउर्जा प्रकल्पाचा वापर, गावातील स्वच्छता, वृक्षारोपण, रस्ते, गटारी, चौक सुशोभिकरण यासारखी अनेक विकासाची कामे भविष्यात करणे गरजेचे आहे. राजापूरची लोकसंख्या लक्षात घेवून पुढील 20 वर्षांपर्यंत शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा, प्राथमिक शाळा इमारतीचा योग्य वापर, शिवारातील रस्ते, म. गांधी तंटामुक्ती समितीचा प्रभावी कारभार, राजापूर गावास शासनाचा 7 लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. या निधीचा विनियोग योग्यरित्या होणे आवश्यक आहे. गावातील यात्रा, हरिनाम सप्ताह व सार्वजनिक कार्यक्रमांचे योग्य नियोजन व निधीचा योग्य वापर, स्मशानभूमी व दशक्रिया ठिकाणी वृक्षारोपण व आवश्यक सुधारणा अशी अनेक लोकोपयोगी कामे ग्रामस्थ सहभागातून व समन्वयातून घडण्यासाठी प्रगत विचारांच्या नागरिकांनी एकविचाराने व सद्भावाने प्रयत्न करणे ही आधुनिक काळाची गरज आहे.
गुरूवार दि. 2 मे 2024 रोजी राजापूरचे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा उत्साहात होत आहे. सासरी असलेल्या लेकीबाळी खास यात्रेसाठी माहेरी येतात. नोकरीसाठी व उद्योगासाठी बाहेरगावी असलेले राजापूरकर गावच्या यात्रेसाठी येत असतात. सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते. या आनंदात सहभागी होण्यासाठी दैनिक युवावार्ताने भैरवनाथ यात्रा विशेषांकाची निर्मिती केली आहे. या विशेषांकास सहकार्य करणार्या सर्व राजापूरकरांचे आभार व यात्रेनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा !
![](http://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/01/rajpal-974x1024.jpg)