तंत्रज्ञानाचा सुजाण वापरच समाजातील संवाद, संस्कार आणि मानसिक आरोग्य वाचवू शकतो

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी सुरेश भटांनी आपल्यासाठी उषःकाल काल होता होता काळरात्र झाली …
अरे आता आयुष्याच्या पुन्हा पेटवू मशाली….
अशा स्फूर्तीदायी ओळी दिलेल्या आहेत. या ओळींची आठवण होण्याचे कारण म्हणजे आज आभासीयुगात, आधुनिक तंत्रज्ञानात जे काही अतिरेकी वापराचे दुष्परिणाम निर्माण झालेले आहेत त्या दुष्परिणामांची भयानकता लक्षात घेऊन दैनिक युवावार्ता समाजाच्या प्रबोधनासाठी, संवादासाठी आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरासाठी विचार प्रगट करीत आहे.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर संपर्कासाठी, संवादासाठी व इतर व्यावसायिक कौशल्यांसाठी होत असताना जेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर अतिरेकी पद्धतीने होत आहे. अयोग्य पद्धतीने होत आहे. तेव्हा या अतिरेकी व अयोग्य पद्धतीचे दुष्परिणाम भयानक स्वरूपात समोर येत आहेत.

आधुनिक काळातील बहु उपयोगी मोबाईल कुटुंबांची, मुलांची, आई-वडिलांची अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी ठरत आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल नावाचे दुधारी शस्त्र आहे. जेव्हा मोबाईलचा वापर फक्त संपर्कासाठी केला जात होता तेव्हा त्याची उपयुक्तता मर्यादित होती. मात्र व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमांद्वारे ज्ञानाचा, माहितीचा स्फोट झाला आणि त्यातून अविवेकी स्वरूपातील अवैध व्यवसायांना तोंड फुटले. विशेषतः माहितीसाठी, करमणुकीसाठी, फसवणुकीसाठी, द्वेषासाठी जेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला तेव्हा समाजातील शांतता कमी होऊ लागली. मोबाईलच्या अतिवापराने कुटुंब सदस्यांमधील संवाद कमी होत गेल्याने एकमेकांमध्ये दुराव्याची भावना निर्माण झाली. प्रत्येकाच्या हातातील मोबाईल घरात, सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी वापरला जात असल्याने व्यक्तिगत संवादासाठी वेळ कमी झाला आणि मोबाईलच्या आभासी वापराचा ताण डोळ्यांवर, मेंदूवर, शरीरावर आल्याने आरोग्याच्या तक्रारीही सुरू झाल्या. नको असलेल्या गोष्टींचे आकर्षण मानवाला सातत्याने असते. गूढता, लैंगिकता, हिंसकता पाहण्यासाठी मानवी मन अधीर होते आणि त्यांचा शोध घेत असताना अनेक नको असलेल्या बाबी मोबाईलच्या स्क्रीनवर दिसू लागतात.

मानवी मनाच्या या ओढीचा गैरफायदा अनेक आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांनी अशा पद्धतीने घेतला की नको असलेली माहिती, अनावश्यक माहिती अल्गोरिदम द्वारे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकून मानवी मन प्रदूषित केले, कमकुवत केले आणि मनावर लगाम न राहिल्याने लहान मुले गेमिंगद्वारे अभ्यास विसरले, जबाबदारी विसरले आणि त्यांच्यातील स्व कौशल्य कमी होऊन ते मोबाईलच्या आधीन झाले. तरुण-तरुणी व्हॉट्सअॅपवर आभासी मैत्रीद्वारे एकमेकांच्या संपर्कात येतात. या भावनेचा, स्वभावाचा गैरफायदा घेत अनेक हिंसक प्रवृत्तींनी किंवा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी घेऊन आर्थिक फसवणूक, महिलांची छळवणूक, तरुणांची फसवणूक करून त्यांचे जीवन उध्वस्त करीत आहे. ही वास्तवता लक्षात घेता समाजातील अशांतता, मनातील अस्वस्थता, व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी सुज्ञ व्यक्तींनी, सामाजिक भान असणार्या संस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे.

या अडचणींचा, दुष्परिणामांचा विचार शासन स्तरावरही होत आहे म्हणूनच सरकारने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी म्हणून अनेक उपक्रम प्राथमिक शिक्षणापासूनच सुरू केलेले आहे. तसेच नागरिकांमधील संवाद वाढवण्यासाठी शून्य मोबाईल टाईम किंवा मोबाईल शिवाय संवाद अशा उपक्रमांची सुरुवातही झालेली आहे. यासाठी सामाजिक, शैक्षणिक, शासकीय संस्थांनी नवी पिढी मोबाईलच्याअतिरेकी परिणामांपासून वाचविण्यासाठी भविष्यात नियोजनपूर्वक प्रयत्न करणे अगत्याचे आहे. कुटुंबातील संवाद व लहान मुलांचे संस्कार मोबाईलशिवाय त्यांचा मैदानावरील कालावधी, इतर उपक्रमांमध्ये त्यांचे प्रबोधन, मनोरंजन आणि मोबाईलमधील, टीव्ही मधील यंत्रणांचा मर्यादित वापर सुज्ञपणे करणे हा एक या दुष्परिणामवरील उपाय होऊ शकेल. भविष्यात मनोरुग्णांची, विकलांग व्यक्तींची आणि गुन्हेगारी व्यक्तींची संख्या व हॉस्पिटलस् कमी करण्यासाठी आजच सर्वांनी प्रयत्न करावेत म्हणून हा लेखन प्रपंच आहे.





















