संगमनेरचा मुळशी पॅटर्न; नोंदणी रद्द करण्याचे महसूल, वनमंत्र्यांच्या सूचना
चिकणी गावातील 200 एकर जमीन ही वन विभागाची असून 40 शेतकरी या जमिनीचे लाभधारक होते. परंतु यातील 100 एकर जमीन ही तालुक्यातील काही व्यापार्यांना हस्तांतरित केली. त्यामुळे चिकणी गावाला वाढत्या लोकसंख्येमुळे शिवार कमी झाला आहे. चिकणी गाव हे भूमिहीन करण्याचा प्रयत्न तालुक्यातील काही लोकांकडून करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या जमिनीच्या नोंदणी थांबावी यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बैठक घेऊन अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे ना. विखे यांचे गावाकर्यांच्या वतीने आभार मानतो
दिपक वर्पे, संगमनेर तालुकाध्यक्ष मनसे
संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर-अकोले तालुक्यातील ‘मुळशी पॅटर्न’ हा चर्चेचा विषय असतानाच, सर्वसामान्य जनता, शेतकर्यांना लुटून आणि शासनाच्या जमिनी लाटून गब्बर झालेले उद्योगपती, व्यापारी, राजकीय पुढारी यांनी संगमनेर तालुक्यातील जमिनींचे लचके तोडण्याचे काम केले आहे. शासनाच्या जमिनी बळकावण्याचे काम करणार्या या ‘लँड माफियां’वर कारवाई होण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील चिकणी या गावात वन विभागाच्या सुमारे 200 एकर जमिनीपैकी 100 एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी- विक्रीच्या आणि नोंदीबाबत चौकशी करून त्या रद्द करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमनेर-अकोले तालुक्यात तत्कालीन महसूल अधिकारी, तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी यांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त होत असून, विद्यमान अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. चिकणी गावातील गट क्रमांक 380/1 मधील 79.97 हेक्टर आर. क्षेत्र जमिनीबाबत हे प्रकरण घडले आहे. या जमिनीवरील नोंदणी व व्यापारी विक्री व्यवहाराबाबत बैठक होऊन या नोंदणी रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या एकूण जागेतील सुमारे 100 एकर जमीन ही काही शेतकरी आणि व्यापार्यांनी बेकायदा खरेदी केली आहे. या जमिनीचे हस्तांतरण व्यवहार बेकायदा असून, याप्रकरणी गुन्हे नोंदण्यात यावेत आणि जमीन नोंदणीची निर्गमित झालेली सूचना नियमबाह्य असल्याने ती रद्द करण्यात यावी, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव एच. गोविंदराज उपस्थित होते, तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ सहभागी झाले होते.चिकणी येथील जमीन बेकायदा खरेदी-विक्री व्यवहार करण्यामध्ये संगमनेरमधील सहा व्यापार्यांची नावे पुढे आली आहेत. या व्यापार्यांच्या नावावर 70 एकर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे. शहर सोडून अचानक ग्रामीण भागात जाणार्या व्यापार्यांच्या या उद्योगाची चर्चा सुरू आहे. तसेच शासनाची जमीन खरेदी-विक्री आणि त्याची नोंदणी करणारे महसूलचे कर्मचारी, अधिकार्यांनी कोणाच्या दबावाखाली हे काम केले, याबाबत चर्चा सुरू आहे.