जीवनप्रवास

दैनिक युवावार्ताचे आधारवड

किसन भाऊ हासे व सौ. सुशिला किसन हासे यांच्या सहजीवनाची 38 वर्षे

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु ॥
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन ।
शब्द वाटे धन जनलोका ॥
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देचि गौरव पूजा करु ॥

राजापूर येथील गरिब, शेतकरी कुटुंबात किसन भाऊ हासे यांचा जन्म झाला. शेती व्यवसाय आणि शेळीपालन आदींमध्ये काम करणे हेच त्यावेळी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. किसन भाऊ हासे यांच्या मनात मात्र शिक्षणाची भूक दिसत होती. 1969 ते 1975 मध्ये आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी राजापूर येथे आपल्या मूळ गावी पूर्ण केले. अभ्यासात हुशार असल्याने माध्यमिक शिक्षणाची तयारी सुरू झाली. घरातील काही व्यक्तींचा विरोध पत्करून त्यांनरी 1975-1978 मध्ये भा.गुं.पा. सह्याद्री विद्यालयात आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 1978-81 मध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सह्याद्री ज्युनिअर कॉलेज येथे पूर्ण केले. उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट कलाकार-दिग्दर्शक आणि अभ्यासात हुशार अशी त्यांची ख्याती सह्याद्री विद्यालय आणि आसपासच्या विद्यालयात झाली. निबंधलेखन, भाषणे, स्नेहसंमेलनमध्ये नाटक, एकांकिका, पोवाडे अशी त्यांची नानाविध रूपे बघावयास मिळाली. जून 1981 मध्ये त्यांनी नाशिक येथे ग्रंथपाल पदवी अभ्यासक्रमास सुरूवात केली. चटणी-भाकर प्रसंगी शिळे अन्न खावून ग्रंथपाल पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. प्रवासासाठी पैसे नसल्याने अनेक वेळा उन्हातान्हातील पायपीट आजही त्यांच्या स्मरणात आहे. 1981-1985 मध्ये त्यांना ज्ञानमाता विद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करण्याची संधी मिळाली. पुस्तकांचे सानिध्य वाढले. वाचनसंपदा वाढली. याकाळात काही रिक्त तासिकांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरूवात केली. त्यानंतर ते सर्वत्र ‘हासे सर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
काहीतरी वेगळे करायचे म्हणून त्यांनी व्यावसायिक नाटकांचे प्रयोग संगमनेरमध्ये केले. यात ते पूर्णपणे यशस्वी झाले. संगमनेरच्या ग्रामिण भागात ‘फिरते चित्रपट’त्यांनी चालविले. विविध मराठी चित्रपटांचे खेळ त्यांनी ग्रामिण भागात दाखविले. अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे या गावात त्यांनी ‘सुशिला’ चित्रपटाचा खेळ दाखविला. दैवकृपा म्हणावी की काय याच गावातील ‘सुशिला तुकाराम सहाणे’ यांच्याशी त्यांचा विवाह 5 मे 1985 साली झाला. दिसायला अतिशय सुंदर, डोळ्यात करारीपणा, अपरिमित कष्टाची तयारी असणार्‍या सुशिला यांच्याबरोबर किसन भाऊ हासे यांची लग्नगाठ बांधली गेली. दरम्यान लग्नाआधी नोकरी करण्यापेक्षा आपला स्वत:चा व्यवसाय असावा असे किसन भाऊ हासे यांना वाटले. गरिबी असल्यामुळे भांडवल नव्हते त्यामुळे त्यांनी कागदाची रद्दी खरेदी-विक्री व्यवसायात 1984 साली सुरूवात केली. या व्यवसायात त्यांनी चांगला जम बसविला. या कागदापासून नंतर त्यांनी पिशव्या तयार करण्याचा नवा उद्योगही सुरू केला. संगमनेर शहरातील किराणा दुकानदारांना कागदी पिशव्या पुरविण्याचे कामही त्यांनी केले.
कॅप्टन लक्ष्मी चौक-साळीवाड्यात 10 बाय 15 च्या खोलीमध्ये या दोघांनी आपला संसार थाटला. संगमनेरमध्ये असल्याने काही नातेवाईकही शिक्षणासाठी या खोलीमध्ये राहू लागले. वडील भाऊ नामदेव हासे, आई भागिरथीबाई हासे, यांनी त्यांनी जमेल तसे सहकार्य केले. मात्र गरिबीचा चटका काय असतो आणि त्यात भाजून निघाल्यावर माणसाची अवस्था कशी होते हे सर्वांनाच माहित आहे. मात्र हे दाम्पत्य राखेतून भरारी घोणार्‍या फिनिक्स पक्षाप्रमाणे होते. गरिबीच्या चटक्यांतून तावून सुलाखून निघाल्यानंतर या दाम्पत्याने 1985 साली ‘आनंद प्रिंटर्स’ या नवीन फर्मची स्थापना केली. प्रिंटींग क्षेत्रात कोणतेही मार्गदर्शन नसताना हा व्यवसाय सुरू करणे खरे तर जोखमीचे काम होते. ट्रेडल मशीन आणि खिळ्यांच्या सहाय्याने ब्लॉक तयार करून लग्नपत्रिका, मुंज, दहावा-तेरावा आदी छापण्यास सुरूवात केली आणि बघता बघता संगमनेरच्या प्रिटींग क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली. संगमनेर-अकोले कार्यक्षेत्रात लग्नपत्रिका छापायच्या म्हटल्या की आनंद प्रिंटर्सचे नाव नंबर 1 ला होते. 1985 साली त्यांनी ‘कृष्णा रबर स्टँम्प्स’ या व्यवसायाची सुरूवात केली. खिळे जुळवून कच्च्या रबराच्या सहाय्याने गरम भट्टीतील शिक्के तयार करण्याची कला त्यांनी आत्मसात केली. बघता-बघता संगमनेर अकोले बरोबरच इतर जिल्ह्यातून त्यांना रबरी शिक्क्याची ऑर्डर यायला सुरूवात झाली.


साहित्यातील आवड आणि संगमनेरकरांच्या बातम्यांची भूक बघून त्यांनी नोव्हेंबर 1989 साली ‘साप्ताहिक संगम संस्कृती’ या वृत्तपत्राची स्थापना केली. 1989 पासून आजतागायत सुरू असणार्‍या क्वचित साप्ताहिकांमध्ये संगम संस्कृतीचे नाव अग्रगणी आहे. 1988 पासूनच ‘संगम संस्कृती दिवाळी अंक’ त्यांनी वाचकांपुढे आणला. दिवाळीच्या फराळाबरोबरच साहित्याचा हा फराळ गेली ‘32 वर्षे’ वाचकांना मेजवाणी देत आहे. अगदी कुसुमाग्रज, शांता शेळके, मु. ग. तपस्वी, शिवाजी सावंत यासारख्या श्रेष्ठ-दर्जेदार लेखकांपासून सुकन्या कुलकर्णी, अलका कुबल या नटींचे मुखपृष्ठ, अंकाला त्याकाळी साज चढवित होते. आता तर संगम दिवाळी अंकाची झळाळी संपूर्ण जगभरात पसरत आहे. 1990 साली साप्ताहिक संगम संस्कृतीचा शासनमान्य यादीत समावेश करण्यात आला. यानंतर किसन भाऊ हासे आणि सुशिला किसन हासे यांनी नव्या प्रोजेक्टमध्ये प्रवेश केला ‘टेलिफोन डिरेक्टरी’. 1990 ते 2005 पर्यंत संगमनेर-अकोले तालुका टेलिफोन डिरेक्टरीचे प्रकाशन त्यांनी केले. या प्रोजेक्टचे ते जनकच म्हणावे लागतील. प्रत्येक व्यक्तीच्या घरात ही टेलिफोन डिरेक्टरी टांगलेली असायची. आजही काहींनी ती जपून ठेवलेली आहे. यानंतर पुन्हा एक नवा प्रोजेक्ट त्यांनी केला त्याचे नाव ‘शेतकरी डायरी’. शेतीविषयक माहिती आणि शेतीमाल विक्रेत्यांची माहिती असे त्याचे स्वरूप होते. साप्ताहिक चालविताना आर्थिक विवंचनेतून या प्रोजेक्टची निर्मिती झाल्याचे मला वाटते. 1992 साली किसन भाऊ हासे यांना शासनाचे अधिस्विकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता मिळाली. 1994 साली त्यांची शासनाच्या विकासवार्ता परिक्षण समितीवर निवड झाली. साळीवाडा-नेहरू चौक-विद्यानगर अशा भाड्याच्या घरांचा प्रवास वर्षानुवर्षे सुरूच होता. 1994 साली त्यांनी श्री संगम ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची

स्थापना केली आणि आजही ते या पतसंस्थेचे चेअरमन आहेत. 1998 साली सिन्नर इंडस्ट्रियल व टेलिफोन डिरेक्टरीचे प्रकाशन केले. संगमनेर-अकोले-लोणी-नाशिक-पुणे असा विस्तार वाढतच गेला. 2002 साली बेरोजगारांसाठी ‘संगमनेर बेरोजगार सहकारी संस्थेची’ स्थापना केली. 2003 साली अकोले रोड येथील स्वत:च्या तीन मजली भव्य इमारतीचे काम पूर्ण झाले. ऑफिस, निवास, मशिनरी एकाच ठिकाणी आणून आपल्या जीवनातील महत्वाचा टप्पा त्यांनी पूर्ण केला. मन कृतकृत्य झाले.
2005 पासून पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाकडून व्याख्याते म्हणून अनेक व्याख्याने त्यांनी दिली. ती अजूनही सुरूच आहेत. व्यसनमुक्ती, तरूणाई, जीवन परिवर्तन हे त्यांच्या व्याख्यानाचे प्रमुख विषय आहेत.
2007 साली अजून एक मोठ्या प्रवासाकडे वाटचाल या दाम्पत्याने सुरू केली. पुरेसा पैसा नसताना, राजकीय पाठबळ नसताना आणि सरळमार्गी पैसा कमविण्याच्या सवयीमुळे त्यांना कासवगतीने जावे लागले. मात्र वाघ हा झेप घेताना एक पाऊल मागेच जातो. 2007 साली या वाघाने संगमनेर अकोले कार्यक्षेत्रात ‘दैनिक युवावार्ता’ या वृत्तपत्राची सुरूवात केली. या वाघाने उशीरा का होईना प्रामाणिक, संयमी आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने दैनिकात पदार्पण केले. सरळमार्गी पत्रकारितेमुळे अल्पावधीत युवावार्ता संगमनेरमध्ये ‘नंबर 1’ ला पोहोचले. मधी मवाळ-तर कधी जहाल लेखन करून संगमनेरकरांचे अनेक प्रश्‍न त्यांनी मांडले. ‘परिवर्तनाचा पुरस्कर्ता’ हे ब्रीदवाक्य त्यांनी खरे करून दाखविले. कुटुंबावर काही वेळा जीवघेणे हल्लेही झाले मात्र हे दाम्पत्य कशालाच घाबरले नाही.
2007 सालीच नवीन प्रोजेक्ट हातात घेवून संपूर्ण महाराष्ट्रातील संपादक आणि पत्रकारांचे संघटन करण्याचे त्यांनी ठरविले. 12 महिने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात बसने प्रवास करून अनेक संपादक पत्रकरांशी संवाद साधला आणि ‘महाराष्ट्र संपादक डायरीचे’ प्रकाशन सुरू केले. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात गेले तरी संपादक आणि पत्रकारांची टीम त्यांच्या हाकेवर कामासाठी तत्पर असते.
2011 साली महाराष्ट्रातील वृत्तपत्र-संपादक आणि पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ‘संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई’ या राज्यस्तरीय संस्थेची स्थापना केली. विस्तार केला. शासनाच्या परिपत्रकामध्ये या संस्थेच्या नावाचा उल्लेख व्हावा ही त्यांच्या कामाची पावती आहे. दरम्यान त्यांनी युवा महाराष्ट्र, जीवन परिवर्तन, सेंद्रीय शेती या विषयांवर 350 पेक्षा जास्त व्याख्याने दिली. शेतीमध्ये आवड असल्याने गांडूळ खत प्रकल्प, कृषी महोत्सव आदींमध्ये हिररीने भाग घेतला. त्यांच्या विविध प्रोजेक्टसाठी, कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले परंतु हे पुरस्कार मागून किंवा पैसे देवून मिळाले नाहीत हेच त्याचे वैशिष्ट्य.
योग, प्राणायाम, व्यायाम, वाचन, निर्व्यसनी, शिस्त, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, प्रेमळपणा, आत्मविश्‍वास यामुळे हे दाम्प्त्य अनेक व्यक्तिंचे आणि आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहे. प्रगतीच्या वाटेत ज्या वक्ती बरोबर येतील त्यांना बरोबर घेवून आणि ज्या व्यक्ती विरोध करतील त्यांच्या मुद्दे समजून त्यात बदल करणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून केवळ कष्ट, कष्ट आणि कष्ट करणे हा त्यांचा स्वभाव आता आमच्यातही रूजला आहे.
सौ. सुशिला हासे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते मात्र एका लढवय्याप्रमाणे आमचे अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असताना त्यांनी बी.ए. चे शिक्षण पूर्ण केले. मराठी टायपिंग, पेजीनेशन, बँकींग, अकौंटींग, मॅनेजमेंट आणि युवावार्ताच्या संपादिका याबरोबरच उत्कृष्ट पत्नी, माता, गृहिणी हा त्यांचा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे. खंबीर साथ काय असते, यश आणि अपयश या दोन्ही वेळी बरोबर असणे किती महत्वाचे असते हे त्यांनी दाखवून दिले. किसन भाऊ हासे हे सुध्दा बी. जे. या पदवीबरोबच एल. एल. बी. चे शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला.
2019 साली ‘युवा पॉलिप्रिंट अँड पॅकेजिंग इंडस्ट्रिज’मध्ये सर्व कुटूंबाने पदार्पण केले आहे. प्रसारमाध्यमांच्या संघटन प्रक्रियेतून कृतीशील समाज उभारावा, ग्रामिण वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, छायाचित्रकार, विविध संस्था-संघटना यांचे प्रश्‍न सोडविणे हाच ध्यास या दाम्पत्याचा आहे.
‘रद्दी – सिध्दी – आणि त्यानंतर प्रसिध्दी’ असा जीवनक्रम माझ्या आईवडिलांचा आहे. डोळ्यात पाणी दाटल्यामुळे आता लिखाण थांबवितो. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

अनेक मान्यवर, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील
व्यक्ती, दैनिक युवावार्ता आणि साप्ता. संगम
संस्कृतीवर प्रेम करणार्‍या हजारो व्यक्तींशी
या दाम्पत्याचा जिव्हाळ्याचा संबंध आला आहे.
कोणाचा नामोल्लेख राहिला तर वाईट वाटेल या
हेतूने कोणत्याही व्यक्तिचा उल्लेख या लेखात
केलेला नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. – सुदीप किसन हासे


तुमचेच-
सुदीप किसन हासे
आनंद किसन हासे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख