80 हजारांची उपस्थिती; 22 रोजी एक्स्पोचा शेवटचा दिवस
संगमनेर (प्रतिनिधी) – नवीन उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ग्राहकांना नव नवीन उद्योगाची, वस्तूंची परिपूर्ण माहिती व्हावी व त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, उद्योजकांना भरारी मिळावी या उद्देशाने मागील १७ वर्षांपासून चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार येथील लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने भव्य सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात येत असते. १६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या सफायर बिझनेस एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळत असून यावर्षी गर्दीचा उच्चांक मोडला आहे. 5 दिवसांमध्ये 80 हजाराहून अधिक नागरिकांनी सॅफ्रॉन सफायर एक्स्पोचा आनंद घेतला.
तरुण, तरुणी, अबाल वृध्दांसह महिला मोठ्या संख्येने या एक्स्पोमध्ये खरेदीचा, खाण्याचा व खेळण्याचा आनंद लुटत आहे. सकाळी १० ते ४ च्या दरम्यान सर्वांना प्रवेश मोफत असून संध्याकाळी ४ नंतर २० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. लायन्स क्लबच्या वतीने येथील उदयोन्मुख उद्योजक व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार्या या उपक्रमात लायन्स सॅफ्रॉन फायरने व्यापारवृध्दी, व्यवसायाप्रती कटीबध्दता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधला आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा व ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू, सेवांची माहिती देणारा, विविध खाद्यपदार्थांच्या चवींची लज्जत देणारा सफायर बिझनेस एक्स्पो अशी ओळख राज्यात बनली आहे. शेवटच्या दोन दिवसात सफायर बिझनेस एक्स्पोचा सर्व संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक संस्थापक अध्यक्ष एमजेएफ गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, प्रफुल्ल खिंवसरा व त्यांच्या टीमने केले आहे. अध्यक्ष स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा व सर्व लायन्स सदस्य एक्स्पोच्या आयोजनामध्ये योगदान देत आहेत.