
सत्यजीत तांबेंच्या भाजपकडे झुकावाचे संकेत !
युवावार्ता (प्रतिनिधी):
संगमनेर – संगमनेरच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडाली असून, अपक्ष आमदार आ. सत्यजित तांबे यांनी काँग्रेस नेतृत्वावर केलेल्या टिकेमुळे दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद, नेतृत्वाची दिशाहीनता आणि कार्यकर्त्यांची नाराजी या मुद्द्यांना हात घालत तांबे यांनी काँग्रेसमधील विसंवाद उघडपणे समोर आणला आहे. एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ठळकपणे आपली मते व्यक्त केल्यामुळे त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
काँग्रेसची विस्कळीत अवस्था झाली आहे. महाविकास आघाडीच्या काळात पक्षाला संजीवनी मिळण्याची आशा होती, परंतु नेतृत्वाने जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांना मागे टाकल्याचा आरोप तांबे यांनी केला. काँग्रेस नेतृत्वाला लोकाधार असलेल्या नेत्यांची भीती वाटते, असा रोखठोक आरोप करत त्यांनी पक्षातील एक प्रकारचा ‘एलिट वाद’ अधोरेखित केला. संग्राम थोपटेंच्या पराभवानंतर पक्षाकडून झालेल्या दुर्लक्षालाही त्यांनी लक्षवेधी ठरवत, काँग्रेसमधील संवादाच्या कमतरतेवर बोट ठेवले.
आ. सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली माझी राजकीय दिशा ठरणार आहे, असे सांगत भाजपकडे झुकणारे संकेत दिले. त्यांनी भाजपमध्ये कार्यकर्त्यांना मिळणार्या संधी, सत्ता आणि सामर्थ्य यांचा उल्लेख करत काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या कार्यपद्धतीला अधिक प्रेरणादायी ठरवले. आ. तांबे भाजपमध्ये येण्याची शक्यता अधिक बलवत्तर होत असली तरी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण आहे. आयुष्यभर विरोध केलेल्या विचारसरणीचे नेतृत्व आता स्वीकारावे लागणार, यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः शाईफेक प्रकरणासारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवरील भाजपचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
सत्यजित तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यांनी काँग्रेससोबत असलेल्या वैचारिक आणि कौटुंबिक नात्यांना बाजूला ठेवून भाजपकडे झुकाव दर्शवला आहे, ही बाब थोरात आणि काँग्रेस दोघांसाठीही चिंतेची ठरू शकते. त्यामुळे संगमनेर काँग्रेसमध्ये मोठी घालमेल निर्माण झाली आहे. संगमनेर हे पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जात असले, तरी सद्यस्थितीत ही पकड सैल झाल्याचे विधानसभेनंतरचे हे संकेत आहेत. सत्यजित तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करतात की नाही, यावर संपूर्ण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये देखील तांबेंचे वैयक्तिक जनाधार असल्याने, ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्या उपस्थितीचा प्रभाव मोठा राहणार हे निश्चित.