समताधिष्टीत समाजासाठी ‘खेळ मांडीयेला’: समग्र परिवर्तनाची वाटचाल

0
2157

तुकाराम महाराजांच्या अभंगांचा समर्पक वापर केलेली एक उत्कृष्ठ कलाकृति

समता प्रतिष्ठान, येवला यांचे तर्फे 26 नोव्हेंबर 2023 संविधान दिनापासून प्रगतिक विचार व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती, या व्याख्यानमालेस पंचवीस वर्ष 25 वर्ष पूर्ण होत आहे.यावर्षी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 425 व्या महानिर्वाणवर्षानिमित्त पाच दिवस तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला, त्यात शेवटच्या दिवशी संग्राम संगमनेर प्रस्तुत आणि डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित, दिग्दर्शित ‘खेळ मांडीयेला’ हे नाटकाचा प्रयोग महात्मा फुले नाट्यगृह, येवला येथे सादर करण्यात आला.
दर्जेदार पटकथा, जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय पात्रावर आधारित कथानक आणि उत्कृष्ट दिग्दर्शन यामुळे पहिल्या काही प्रसंगापासूनच नाटक नाट्यरसिकांच्या मनावर ताबा घेते. चारशे वर्षापूर्वीचा संत तुकारामांच्या चरित्रातून मानवतेचा संदेश देण्यात दिग्दर्शक, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे यशस्वी झाले आहेत. प्रथमदर्शनी तुकाराम महाराजांच्या विचारांचे, अभंगांचे प्रसंगानुरूप समर्पक भावार्थ सांगताना इतिहासातील घटनांचा संशोधनात्मक उत्कृष्ट मेळ घातलेला दिसतो. उत्तम पार्श्व संगीत, सुयोग्य नेपथ्य, इतिहासकालीन अनुरूप वेशभूषा, रंगभूषा या जमेच्या बाजू असून प्रत्येक कलाकाराने भूमिकेला योग्य न्याय आहे. सूत्रधार, आवली यांच्या भूतकाळ, वर्तमानकाळ यामधील स्वैर वावर असल्याने भूतकाळातील इतिहासकालीन घटना, त्यांचा आजमितीस असणारे संदर्भ, आजच्या घटनेचे पाळेमुळे इतिहासातील पौराणिक घटनांसोबत जोडताना, त्यांची योग्य सांगड घालताना दिग्दर्शक कुठेही गल्लत करत नाही. याबरोबरच भविष्यातील ‘मानवतेवर’ आधारीत आशादायी समाज रचनेचे चित्र निर्माण करताना हे नाटक समाजाला दिशादर्शक ठरत आहे. तुकाराम महाराजांची परिपक्व भूमिका, आवलीची कुटुंबवत्सल भूमिका, याबरोबरच मम्बाजीची, पंडित, पंत यांची खलनायकी उत्कृष्ठ भूमिका आणि इतर सर्व सह कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयातून नाटक अखेर पर्यंत विचार करायला लावते, नव्हे नव्हे तर नाटक संपल्यानंतर विचारांची चक्रे फिरू लागतात हे ह्या नाटकाचे खरे यश आहे. नाटकाच्या प्रत्येक टप्प्यावर तुकाराम महाराजांच्या अभंगांचा समर्पक वापर केल्याने एक उत्कृष्ठ कलाकृति पहावयास मिळते.


भेदाभेद वगळता वेदांचा सम ब्रम्हाचा अर्थ, गोप, गोपिका आणि गोपाळाना प्रेमाचा समत्वाचा कला खाऊ घालणारया भगवान कृष्णाचा संदेश, भगवान बुद्ध यांचा अष्टान्गिक मार्गांचा संदेश आणि नामदेव महाराजांचा कवित्व करण्याचा संदेश या प्रसंगांचा यथोचित वापर करून तुकारामाची संतत्वाकडे वाटचाल दाखविताना सगुण किंवा निर्गुण भक्तीच्या पलीकडे जाऊन “विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” या अभंगांतून अद्वैताचा सर्वसमावेशक संदेश देऊन समकालीन रूढ असलेला भेदाभेद हा भ्रम असून तो अमंगळ कसा आहे हे या नाटकातून ठसविलेले आहे.
नाटकातील काही संवाद प्रत्येक मनुष्याला जगताना अगदी चपखल लागू होतील आणि त्यावर दोन क्षण का होईना विचार करावयास लावणारी आहेत. यामधील काही तुकाराम महाराजाचे संवाद आणि अभंग मनावर खोल परिणाम करून जातात. “जनावरांना पापपुण्य काळात नाही, ते कुठलाही संचय करत नाहीत, पण ही मानसं सर्वांचा संचय करतात, अगदी पापाचासुद्धा”!, यामधून मोह बंधनात अडकलेल्या मानवी स्वार्थी वृत्तीचे जिवंत चित्र उभे केले आहे.
याबरोबरच चारशे वर्षापूर्वी मुलभूत अधिकारांना वंचित असणार्या शुद्र,स्रिया याबद्दल काळजी करताना तुकाराम महाराज म्हणतात, “कित्येक वर्षापासून उपाशी ही मानसं, अगदी आदिम काळापासून , केवळ पोटानं उपाशी नाही, ज्ञानाने, धनाने, मनाने आणि अधिकारानेसुद्धा! धान्यानं पोटाची भूक एकवेळ भागेल पण इतर गोष्टींचा काय? कोण देईल त्यांना अधिकार”? यातून त्यांची समाजातील प्रत्येकच्या अधिकाराबद्दल बोलताना कार्ल मार्क्सच्या दोनशे वर्षे आधी सावकारकी करताना शेतकऱ्यांची गहाणखत स्वतःच्या हाताने बुडवणारे व जगातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून सातबारा कोरे करणारे सरकार म्हणजेच तुकाराम महाराज समतेचा संदेश देत आहेत. नाटकामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग नाटकाची उंची गाठतो. यामध्ये “जसे वैष्णव तसे मावळे” असा भक्ती-शक्तीचा दुवा तयार करून “राजे असेच सर्वभूती समत्व ठेवा, आपण रयतेच राज्य उभारावं” असा तुकाराम महाराज छत्रपतीना संदेश देतात.


दुष्काळाच्या प्रसंगी स्वताच्या घरचे धान्य सर्व गावकर्यांना वाटून देणारे संवेदनशील तुकाराम, “आता मला सर्वांचाच संसार करावयाचा आहे, आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणासी, असे म्हणणारे हृदयस्पर्शी तुकाराम, शेतकर्याने सावकाराचे कर्ज फेडणे शक्य नाही हे जाणून घेतल्यानंतर स्वतः गहाणवटी इंद्रायणी नदीत बुडविणारे उदार तुकाराम, दिंडीमध्ये समाजाकडून मंदिराचे दारे बंद झाली असताना म्हशिदितील “अल्ला बगर नाही कोये, अल्ला देवे, अल्ला खिलावे, असे कीर्तन करताना सर्वधर्म समभावाचे शिक्षण देणारे तुकाराम, आपण वैराग्याकडे पावलं टाकताना संसारातील भाऊ कान्होबाला समजून घेणारे तुकाराम, आवलीचे प्रेम समजून घेऊन तीला घास भरवणारे तुकाराम, आणि मंबाजी, पंडित, पंत यांना “अरे धर्मठकानो, देवाच्या, धर्माच्या नावाखाली कर्मकांडाच्या साखळ्यानी जखडून ठेवून हजारो वर्षांची तयार केलेली गुलामी, जुलमी शोषनव्यवस्था बस्स आता! असे म्हणणारे जमदग्नी तुकाराम अशी विविध रूपे दाखविताना त्यांच्या जीवनपटातील प्रसंगांचा सुरेख वापर केलेला आहे. जाता जाता तुकाराम महाराजांच्या नावावरील चमत्कारावर स्पष्ट भाष्य करून कित्येक घटनांचा ‘गर्भितार्थ’ समाजासमोर आणण्यास हे नाटक उजवे ठरते. यावरून तुकाराम महाराजांना दैवी मखरात सजवून न बसवता त्यांचे मनुष्यारुपातील योगदानाबद्दल सतत जागरूक राहून त्यांच्या गाथारुपी वैचारिक उपदेशावर समाजाने आचरण करण्याचा संदेश आपणास मिळतो.
नाटक समारोपाला जाताना प्रत्येकाने अध्यात्मिक / विज्ञानवादी , पुरोगामी / प्रतिगामी अश्या वादांमध्ये अडकून न पडता तुकारामांनी दिलेल्या मानवी मूल्यांना – समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, विवेक, सदाचार यांना प्राथमिकता ठेवून आचरण करण्यास संत महात्म्यांना जाती, धर्मांमध्ये अडकवून न ठेवता, इतिहासाचे विकृतीकरण न करता, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी खऱ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा,असा संदेश देते. “गाथेतील सत्य शोधून हीच गाथा उद्याच्या रोबोटिक जगात तुमचा दिशादर्शक जीपीएस अनु गुगल मेप ठरेल” ह्या भविष्यातील आशादायी शब्दांनी नाटकाचा शेवट होऊन नाटकातील विचार मात्र मनामध्ये रेंगाळत राहतात.
हे नाटक म्हणजे एक वैचारिक ठेवा असून महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण वांग्मयीन पुरस्काराने या नाटकास गौरवलेल्या कलाकृतीस प्रत्येकाने एकवेळ तरी प्रत्यक्ष पाहावं!

शब्दांकन ः-प्रा.डॉ. रमेश सहादू पावसे
अमृतवाहिनी अभियान्त्रीकी महाविद्यालय, संगमनेर
सदस्य, अभ्यासमंडळ, ईन्डटीसी, सा.फु.पुणे विद्यापीठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here