घरातल्या घरात गजबजलेलं गाव – वात्सल्यसिंधू आई

आई गंगुबाई लक्ष्मण आहेर (गंगुबाई नथु देवकर) यांचा जन्म 1 जानेवारी 1934 रोजी देवकर कुटुंबात झाला. आळेफाटा शेजारील वडगाव आनंद हे त्यांचे गाव. वडिल नथु कान्हुजी देवकर आणि आई लक्ष्मीबाई नथु देवकर यांनी अतिशय कष्टातून आपला प्रपंच चालविला. शेतीची पडेल ती कामे केली. देवकर परिवारात एकूण सात भावंडे. स्व. अनुसयाबाई, स्व. गंगुबाई, पार्वतीबाई, झुंबरबाई, तान्हाजी, हरिभाऊ आणि देवराम. आई वडिल अशिक्षित असले तरी प्रसंगानुरूप मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. गंगुबाई यांचे लहान बंधु तान्हाजी देवकर यांनी मुंबई येथे सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून काम केले तर देवराम देवकर यांनी मुंबई येथे असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलिस म्हणून काम केले. हरिभाऊ देवकर यांनी नावाप्रमाणे हरिभक्तीसाठी स्वत:ला वाहून दिले. सर्व भावंडांनी अगदी गुण्यागोविंदाने आपला प्रपंच सांभाळला. देवकर कुटुंबातील दुसरे रत्न कै. गंगुबाई यांचा विवाह घारगाव येथील लक्ष्मण बापू आहेर यांच्यासोबत झाला. त्यावेळी तिचे वय साधारणत: 16 वर्षांचे असेल. आहेर कुटुंबाची परिस्थिती त्या काळी बिकट होती. अत्यल्प शेती आणि प्रचंड कष्ट याची सांगड आईने आणि बाबांनी घातली. घारगाव पट्ट्यातील शेती कोरडवाहू होती. पाण्याचा प्रचंड तुटवडा, उत्पन्न अतिशय जेमतेम होते. त्यामुळे एका व्यक्तीच्या कामाने संसाराचा गाडा चालणार नव्हता. आई मुळातच प्रचंड जिद्दी आणि कष्टाळू. पतीच्या खांद्याला खांदा लावून तिने शेतीची कामे केली. घारगाव मधील डोंगराळ भागात शिदाईकवाडी येथे त्यांची वस्ती होती. आहेर कुटुंबाचा परिवार म्हणजे अष्टपुत्रांचा. बबुबाई, चांगुणाबाई, शांताराम, मिनाबाई, सुखदेव, विमल, सुरेश आणि कमल. आई अशिक्षित, बाबा दुसरी शिकलेले असे असूनही मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे ही त्यांची मनोमन इच्छा. 1972ला भयानक दुष्काळ पडला. कुटुंब मोठे आणि कमविणारे दोघेच. खंडाने शेती करणे, वाट्याने शेती घेणे, नाला बांधकामाची कामे करणे आदी कष्टाची कामे त्यांनी केली. या कष्टाच्या कामामध्ये पैसे मात्र आठवड्याला मिळायचे. त्यावेळी रेशनच्या धान्यावर कुटुंबाला आपली जीविका भागवावी लागायची. रेशनवर लाल ज्वारी आणि मका भेटायची. मुलांना रेशनची लाल ज्वारी, मका आवडत नसे. आई बाजरी विकत आणून मुलांना भाकरी खाऊ घालायची स्वत: मात्र रेशनची मका खायची. या माऊलीने मुलांना कधीच उपाशी राहू दिले नाही. फ.मु. शिंदे यांनी आईची उपमा कवितेच्या स्वरूपात खूप छान पध्दतीने मांडली आहे.
आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही!


आई जात्यावर दळण दळायची आणि गाणेही गुणगुणायची. मुली मोठ्या झाल्या त्यांनाही समजू लागले. रानातून शेण गोळा करून त्याचे गोळे बनवायचे आणि ते विकायचे. त्यातून कुटुंबाच्या खर्चाला हातभार लागायचा. मोठे काका शांताराम आहेर यांचे शिक्षण अकरावीपर्यंत (जुन्या काळातील एसएससी) घारगाव येथील भारत हायस्कूलमध्ये झाले. घरची परिस्थिती बेताची असल्या कारणाने त्यांनी सोसायटीमध्ये मदतनीस म्हणून काम केले. 1979 ला नोकरीसाठी ते मुंबईला गेले. मार्केटमध्ये नोकरी केली. 1980 साली त्यांचा विवाह झाला. 1985 साली त्यांनी भाजीपाला मार्केटचे लायसन्स मिळवून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. शांताराम काका (मोठे पप्पा) यांची मुले उच्चशिक्षित असून नातवंडांनी घर भरले आहे. सुखदेव नाना (काका) 1979 साली भारत हायस्कूलमधून 10 वी पास झाले. 1982 साली आई-वडिलांबरोबर त्यांनी नाला, रोजगार हमी ही कामे केली. 1982 ला ते मुंबईला ते नोकरीनिमित्ताने गेले. 1-2 वर्षे लोकल कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 1985 साली त्यांनी भाजीपाला मार्केटचे लायसन्स मिळविले आणि स्वत:चा भाजीपाला व्यवसाय सुरू केला. सुखदेव नाना यांची मुले सुध्दा उच्चशिक्षित असून नातवंडांमुळे घराचे गोकुळ झाले आहे.माझे वडिल सुरेश आहेर हे आई वडिलांच्या अतिशय जवळ होते. घारगाव येथेच स्थायिक असल्यामुळे आई-वडिलांची सेवा करण्याचे मोठे पुण्य मम्मी-पप्पांना मिळाले. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घारगाव येथे झाले असून 1988 साली त्यांनी ओतूर येथून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात बी.कॉम. पूर्ण केले. 4 जून 1990 रोजी त्यांचा विवाह मामाच्याच मुलीबरोबर म्हणजे तान्हाजी देवकर बाबा यांची कन्या रंजना हिच्याबरोबर झाला. आत्याच्याच घरी आल्यानंतर सासू-सुनांचे नाते माय-लेकीसारखे होते. दोघी एकमेकांच्या अतिशय जवळ होत्या. 1991 साली पप्पांनी प्रवरानगर येथे डी.फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. माझ्या नावानेच त्यांनी प्रियंका मेडिकल हा व्यवसाय सुरू केला.
आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया।
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा।


तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे पप्पांनी कुटुंबाची घडी बसविली. समाजसेवेचा वसाही घेतला. घारगावचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम केले. हे कार्य करीत असताना उत्कृष्टरित्या शेती देखील केली. आईला आपल्या मुलाचा आणि सुनेचा विशेष अभिमान होता. मुलगी (आत्या) कमल फापाळे यांनीही डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. शेतीबरोबरच मुलांच्या शिक्षणाला त्यांनी विशेष महत्त्व दिले. आई-बाबांनी सर्व मुलींचे लग्न त्यावेळच्या परिस्थितीनुसार व्यवस्थित पार पाडली. 80 च्या दशकात कष्टाच्या जोरावर त्यांनी शेतजमीन विकत घेतली. टोमॅटो आणि भेंडीची पिके यशस्वीरित्या या दाम्पत्याने घेतली. फक्त आपल्याच कुटुंबाला नाही तर दारी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी सर्वोतोपरी मदत केली. ज्या आई-बाबांनी वाट्याने शेती केली त्याच आई बाबांनी आज आपली शेती वाट्याने दिली आहे. येथील सरकती यांनासुध्दा त्यांनी खूप जीव लावला.


जे कां रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥1॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥2॥


रंजल्या-गांजल्यांना आई बाबांनी नेहमीच मदत केली. कामात आणि मदतीमध्येच त्यांनी देव पाहिला. अतिशय प्रेमळ, कष्टाळू, माणुसकी जपणारी आई सर्वांना उदंड प्रेम देणारी होती. तिची आदरयुक्त भिती सर्वांना होती मात्र सर्वांना ती हवीहवीशी वाटायची. 8 मुले, 20 पेक्षाही अधिक नातवंडे आणि पतवंडे असलेल्या या गोकुळातून तिचे जाणे अत्यंत दु:खद आहे. पतवंडांमध्ये तिचा विशेष जीव होता. गेल्या काही दिवसांपासून हृदयांच्या आजाराने ती त्रस्त होती. यावेळी परिवाराने आईची सर्वोतोपरी सेवा केली. उत्कृष्ट दवाखाना आणि औषधोपचार केले. वयाच्या 90 व्या वर्षी शरीर थकल्याने 8 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता संगमनेर येथे तिची प्राणज्योत मालवली.

देव भेटेल तुजला आपुल्या घरी !
आई वडिलांच्या पावन चरणावरी !!
आधी चरण धरावे तू आई बापाचे !
मग स्मरण करावे भगवंताचे !!
तुला दर्शन होईल मन मंदिरी!!
आई वडिलांच्या पावन चरणावरी !!
ती तुझी पंढरी, ती तुझी जेजुरी !!
आई वडिलांच्या पावन चरणावरी !!


आई या जगतात नाही मात्र बाबा लक्ष्मण आहेर यांची सेवा आहेर परिवार आता करीत आहे. बाबांचे वय आता 95 वर्षे आहे. या वयातही बाबा अतिशय कणखर आहेत. त्यांच्याप्रमाणेच सर्व कुटुंबाने आता कणखर होऊन आईंच्या चांगल्या आठवणीत आणि संस्काराच्या शिदोरीत पुढील मार्गक्रमण करावे. आमच्या सर्व परिवाराच्या वतीने, दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने आईला भावपूर्ण श्रध्दांजली.
राम कृष्ण हरी ॥

  • प्रा. प्रियंका सुदीप हासे (नात)
    संचालक – दैनिक युवावार्ता

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख