कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफताना ते बोलत होते
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – भारताला स्वातंत्र्य देताना ब्रिटीशांनी त्याचे 1947 साली चतुराईने विभाजन केले. भारताचा मुकूटमणी असलेल्या कश्मिरमध्ये धर्माच्या नावाने जाणिवपूर्वक अशांतता निर्माण केली. तेथील 370 कलमाने एका देशात दोन देश अस्तित्वात होते. मात्र आत्ता 370 कलम रद्द केल्याने त्याचे दुरगामी परिणाम आगामी 10 वर्षात समोर येतील असे प्रतिपादन परम विशिष्ट सेवा मेडल विजेते सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले. कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या 46 व्या वर्षातील अखेरचे पुष्प गुंफताना ते काश्मिर – काल आज आणी उद्या या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी पतित पावनचे माजी प्रांतपाल, शिवव्याख्याते प्रा. एस. झेड. देशमुख होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, उपाध्यक्ष अरुण ताजणे, प्रकल्पप्रमुख अॅड. ज्योती मालपाणी, ओमप्रकाश आसावा, स्मीता गुणे आदी होते.
प्रास्ताविकात प्रा. ओंकार बिहाणी म्हणाले, ही व्याख्यानमाला सर्वांसाठी आनंदसोहळा असल्याने सात दिवसानंतर अनामिक हुरहुर लागते. मनाील विचारांना गती देणारा हा उपक्रम अत्यंत आव्हानात्मक आहे. अनेक चाळणीतून प्रभावी वक्ते निवडताना संयोजकांचा कस लागतो. मात्र आलेल्या प्रत्येक वक्त्याने संगमनेरच्या रसिक श्रोत्यांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. लेप्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स या पदावरुन निवृत्त होताना प्रत्येक टप्प्यातील कार्यकाळात पदके मिळाली. कारगिल युध्दात 22 अतिरेक्यांना कंठस्नान, गंभीर जखमी अवस्थेतही बटालियनचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल वुंड मेडलने सन्मान, आंतरराष्ट्रीय संबंधावर डॉक्टरेट मिळवलेल्या या अधिकार्याने अतिसंवेदनशिल भागात काम केले आहे. तसेच अंगोला, वॉशिंग्टन, हवाई आदी देशात काम केले असून त्यांचा मुलगा, सून, जावई, मुलगी, भाऊ सर्व सैन्यदलात आहेत. अध्यक्षीय भाषणात प्रा. एस. झेड देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व सावरकरांना समजून न घेतल्याने देशावर अनेक संकटे आली. सावरकरांविषयी चुकीच्या गोष्टी समाजात भिनवल्या, त्यांची उपेक्षा करण्यात आली.
निंभोरकर यांनी त्यांच्या सैनिकी आयुष्यातील निवडक प्रसंग सांगताना देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. देशाचा मुकूटमणी असलेल्या काश्मिरशिवाय भारत अपूर्ण आहे असे सांगताना आपल्या कॅप्टन ते ले. जनरल पदापर्यंतच्या 17 वर्षांचा कालखंड काश्मिरमध्ये घालवला. या अशांततेच्या काळात अनेक आव्हानांना त्यांनी समर्थपणे तोंड दिले. काश्मिरची राजकिय वाटचाल विषद करुन 1947 साली देशाला स्वातंत्र्य देताना युनायटेड नेशनच्या मान्यतेने देशाची फाळणी झाली. यात पाकिस्तानला झुकते माप देण्यात आले. 34 कोटी लोकसंख्येच्या भारताला 34 लाख चौरस किलोमीटर तर साडेतीन कोटी लोकसंख्येच्या पाकिस्तानला 10 लाख चौरस मिटरचा भुभाग मिळाला. या भागाची फारशी माहिती नसलेल्या रेडक्लिफ या ब्रिटीश अधिकार्याने देशाचे विभाजन करणारी सीमारेषा आखली. हा विरोधाभास व अन्यायही तत्कालिन भारतीय राज्यकर्त्यांनी ही तडजोड विनातक्रार स्वीकारली. फाळणीनंतर पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या दोन्ही देशांचे सेनाध्यक्ष ब्रिटीश होते. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये धुडगुस घातला, स्त्रियांची धिंड काढली, हिंदुंची अमानुष कत्तल केली. या काळात झालेल्या युध्दात लेह, लद्दाख व श्रीनगरला जोडणारी 15 हजार फुट उंचीवरील झोजिला खिंड भारतीय सैन्याने केवळ खाकी कपडे, कॅनव्हास शुज व साधारण दर्जाच्या हत्यारांनी लढवली. जमिनीवरील युध्दात प्रतिकुल परिस्थीतीत जिंकलेला हाजीपीर खिंड, कारगिलचा भुभाग ताश्कंद करारानुसार परत करावा लागला. 1980 नंतर देशाची राजकिय व आर्थिक परिस्थिती बिकट होती. अशा वेळी जनरल झिया उलहक यांनी ऑपरेशन टोपॅक अंतर्गत काश्मिरमध्ये स्थानिकांच्या मदतीने उठाव केला. सुमारे 10 हजार प्रशिक्षीत अतिरेकी युवक काश्मिरमध्ये घुसले. त्यांनी रेडीओ, टिव्ही, न्यायालये ताब्यात घेतली. 1991 मध्ये काश्मिरात प्रशासन शिल्लक राहिले नव्हते. दर शुक्रवारी त्यांची परेड व्हायची. या परिस्थीतीवर भाष्य करणार्या वादग्रस्त काश्मिर फाईल्स चित्रपटावर भाष्य करताना ते म्हणाले, त्या चित्रपटात प्रत्यक्षात दाखवल्यापेक्षाही भिषण परिस्थिती होती. त्यात 10 टक्केही सत्य दाखवलं गेलं नाही. सुमारे 3 लाख काश्मिरी पंडितांनी खोर्यातून पलायन केले. त्यांच्या बायका, संपत्ती, जमिनी, घरे वाटून घेतली. 1996 मध्ये भारताने काश्मिरवर ताबा मिळवला. साडेनऊ हजार अतिरेकी मारले गेले. असे निंभोरकर यांनी सांगितले.