युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होताच विविध आघाड्या आणि पक्ष यांनी आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली. आमदारकीची स्वप्ने पडणार्या अनेक महोदयांनी गुडघ्याला बाशिंग बांधून विविध ठिकाणी संपर्क सेतू निर्माण केले. अनेक आयाराम-गयारामांनी पक्षांतरे केली. अनेकांनी बंडाचे झेंडे उभारले. काहींनी निष्ठा व प्रतिष्ठा बाजूला ठेऊन सत्तेवर जाण्यासाठी विविध पर्यायांचा अंदाज घेतला. एकूणच निवडणूकीचे वारे काही ठिकाणी तप्त स्वरूपात व काही ठिकाणी सुप्त स्वरूपात वाहू लागले. महाराष्ट्राला विचारांची परंपरा असल्याचा काहींना विसर पडून कुणाच्या चेहर्यावर, कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले. यामुळे सामान्य मतदार संभ्रमीत होऊ लागला. कोणता झेंडा घेऊ हाती अशी काहीशी अवस्था होऊ लागली.
पुर्वीचा अहमदनगर व आताचा अहिल्यानगर जिल्हा सामाजिक चळवळींचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. समन्वयाचे राजकारण स्विकारून सहकाराची समृद्धी निर्माण झाली. सहकारातूनच सत्ता केंद्रे निर्माण झाली. सत्ता स्पर्धेतून विरोधक निर्माण झाले. असे विरोधक निवडणूक काळात वर्चस्व अबादित ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असतात. अहिल्यानगरमध्ये कर्डीले, जगताप, कळमकर, कोतकर, गांधी, राठोड या नावांनी सत्तास्थाने चालविली. कोपरगावमध्ये कोल्हे, काळे, परजणे, रोहमारे यांनी सत्तास्थाने चिालविली. नेवास-शेवगामध्ये ढाकणे, घुले, मुरकूटे, गडाख यांनी सत्तास्थाने चालविली, श्रीरामपूरमध्ये आदिक, मुरकूटे, ससाणे, कांबळे, कानडे, लोखंडे यांनी सत्तास्थाने चालविली. रहाता -संगमनेरमध्ये थोरात, विखे यांची सत्तास्थाने ठिकविण्याची स्पर्धा सर्व महाराष्ट्रास माहित आहे. सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचा वारसा माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील व त्यांचे सुपूत्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे चालवित आहेत. संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या नेतृत्वाखालील सरकार संपूर्ण राज्यास आदर्श होऊल असे काम आ. बाळासाहेब थोरात व त्यांचे कार्यकर्ते करीत असतांना त्यांना विरोध करणारे भक्कम प्रतिस्पर्धी नेतृत्व तयार होऊ शकले नाही. माजी मंत्री बी.जे. खताळ पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन ह.भ.प.वसंतराव गुंजाळ, आबासाहेब थोरात व उद्योगपती साहेबराव नवले यांनी विरोधकांची भुमिका घेऊन विधानसभेची उमेदवारी केली. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. माजी खासदार बाळासाहेब विखेंनी संगमनेर-अकोले तालुक्यात विश्वासू कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. व प्रसंगी लोकसभा, विधानसभा निवडणूकांसाठी त्यांचा उपयोगही करण्यात आला. विखे परिवाराचे नेतृत्व मानणारे व संगमनेरमध्ये स्वता:चे अस्तित्व निर्माण करू पहाणारे अनेक गट आहेत. प्रसंगानरूप ते कधी एकत्र असतात तर कधी स्वतंत्र असतात. अनेक प्रसंगी संगमनेरच्या प्रश्नांसाठी विखे परिवाराचे सहकार्य घेतले जाते. त्यातूनच विखेंविषयी अभिमान व निष्ठाही निर्माण होतात. अशा प्रकराचा अभिमान व निष्ठा बाळगून अनेक विखे समर्थक आपले अस्तित्व टिकवून आहेत.
संगमनेरचा सहकार अमृत उद्योग समूह नावाने अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनंतर आ. बाळासाहेब थोरात यांनी एकहाती सत्ता टिकवून व सहकार वृंद्धींगत केला आहे. संगमनेरच्या तालुकास्तरीय सहकारी संस्था राज्यात अग्रेसर असून संगमनेरची बाजारपेठ व अर्थव्यवस्था अतिशय समृद्ध असल्याची ग्वाही दिली जाते. संगमनेर तालुका कृषी, शिक्षण व उद्योग समृद्ध करण्यासाठी हजारो पाणीपुरवठा योजना, शेततळी, केटीवेअर्स यांचे जाळे निर्माण झाले. मेडिकल, इंजिनिअरींग, फार्मसी, कृषी महाविद्यालये स्थापन करून शिक्षणाची परंपरा निर्माण झाल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाखो रोजगार निर्माण झाले आहेत. त्यामुळे आ. बाळासाहेब थोरातांचे नेतृत्व संगमनेर तालुक्यात प्रभावी आहेच परंतू राज्यातही त्यांना मोठा मान असल्याने त्यांना नामोहरण करण्यासाठी व संगमनेरच्या समृद्धीला शह देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळे प्रयत्न होत असतात. त्यातीलच विखे-थोरात मतभेद राज्यात माहित असून विधानसभा निवडणूकीत अधिक गडद झाले आहेत.
2024 चे विधानसभा निवडणूकीसाठी शिर्डी मतदार संघातील आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे यांची तयारी पुर्वीपासूनच आ. थोरातांच्या सहकार्याने चालू होती. महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांना पराभूत करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न जोराने सुरू आहेत. त्याचवेळी संगमनेर मतदार संघात बाळासाहेब थोरातांना पराभूत करण्यासाठी विखे परिवाराने त्यांचे संगमनेरमधील कार्यकर्ते अमोल खताळ यांना उमेदवार म्हणून निवडणूकीत उतरविले आहे. महायुतीमध्ये संगमनेरची जागा शिंदे सेनेला गेल्याने ऐनवेळी भाजपामध्ये असणारे अमोल खताळ यांनी पक्षांतर करून शिंदे सेनेत उमेदवारी स्विकारली. असे असले तरी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत विखे पाटलांची यंत्रणा उमेदवार अमोल खताळ यांना सहकार्य करीत आहे. संगमनेरमधील भाजपा पक्ष, शिंदे सेना, महायुतीचे सलग्न पक्ष अमोल खताळ यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील असतांना अनेक पक्षांतरे केल्याने व विखे परिवाराच्या आधाराने अमोल खताळ किती मते मिळवू शकतील अशी उत्सुकता संगमनेर तालुक्यात आहे. संगमनेर विधानसभेसाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारी जाहीर करून मोठ-मोठ्या सभाही केल्या. मात्र ऐनवेळी माघार गेऊन अमोल खताळांची उमेदवारी जाहीर केली.
यामध्ये अमोल खताळ बाळासाहेब थोरातांना पराभूत करून विजयी होणार की डॉ. सुजय विखेंसाठी त्यांचा बळी जाणार अशी उत्सुकता संगमनेरच्या जनतेमध्ये आहे.