पाचशे किलो गोमांस जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना व संगमनेरात अनेकवेळा कत्तलखान्यांवर कारवाई केलेली असतांना देखील येथील कत्तलखान्यात अनेक जनावरांची हत्या केली जाते. कत्तल केलेले गोमांस राज्यातील विविध भागात पोहचविले जाते. हे पोहचवितांना हे गोमांस तस्कर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असतात. महागड्या कार, वाळूच्या टेम्पोत तर आता या तस्करांनी भुसाच्या पिकअपमध्ये गोमांसची वाहतूक सुरू केली. मात्र याची भनक उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना लागताच त्यांनी कारवाई करत पिकअपसह सुमारे 500 किलो गोमांस जप्त केले. तसेच या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई काल मंगळवारी रात्री करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमी मिळाली की, संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथुन एका पिकअपमधुन मुंबई येथे गोमांस जाणार आहे. ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने डिवाएसपी यांनी आपल्या सहकार्यांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोना राहुल डोके व सहकार्यांनी जोर्वे नाका येथे छापा टाकला. यावेळी एक संशयित पिकअप पुना रोडने जाताना दिसल्याने सदर पिकअपचा पाठलाग करुन ही पिकअप खांडगांव फाटा येथ रात्री 12.45 वाजता पकडण्यात आली. यावेळी चालक हलिम शेख युसुफ वय- 49 वर्षे रा- कासारा जि. ठाणे हल्ली रा. -भारतनगर संगमनेर याला ताब्यात घेण्यात आले. या पकडलेल्या पिकअपमध्ये नेमके काय आहे याची खात्री केली असता त्यात कत्तल केलेले गोमांस मिळुन आले. हे गोमांस कुणाच्या मालकीचे आहे याची चौकशी केली असता अनिस गुलामहैदर कुरेशी रा. मदिनानगर संगमनेर याचे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचा मंहिद्रा कंपनीचा पांढर्या रंगाची पिकअप क्र.चक 15 एफव्ही 6862 असा तर एक लाख रुपये किमतीचे 500 किलो गोमांस असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पो.ना. राहुल डोके यांनी पंचनामा करत जप्त केलेले गोमांस व पिकअप गाडी पोलीस स्टेशनला आणली. याप्रकरणी हलिम शेख युसुफ , अनिस गुलामहैदर कुरेशी यांचे विरुद्ध भा.द.वि.क. 269, 429 प्राणी संरक्षण कायदा कलम 5 (अ), (क), 9 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.