पुस्तकांशी दोस्ती शिकवतेय Tinytales लायब्ररी

0
1218

विद्यार्थ्यांना वाचनप्रवृत्त करण्याचा डॉ. रसिका वाघोलीकरांचा उपक्रम


आजकालची मुले पुस्तके वाचत नाहीत, असा तक्रारीचा सूर काढणे खूपच सोपे आहे. मात्र, यापलीकडे जाऊन मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करण्याचे आणि त्यांची ही आवड जोपासण्याचे सक्रिय प्रयत्न संगमनेर मधील ‘Tinytales’ या उपक्रमातून करण्यात येत आहे.
डॉ रसिका वाघोलीकर यांच्या प्रयत्नातून हा आगळा वेगळा उपक्रम आकारास आला आहे. लहान मुलांच्या बोलण्यात पुस्तकांचे उल्लेख नसतात. मात्र, त्यांची योग्य वाढ होण्यासाठी मोबाईल फोन पासून दूर ठेवून वाचनाची सवय लागणे गरजेचे आहे, या विचारातून डॉ रसिका यांनी स्वतःच्या घरी लायब्ररी सुरू केली आहे.
संग्रही असलेले बालसाहित्य, तसेच स्वतः पुस्तके आणून तर कधी लोकांकडून भेट स्वरुपात पुस्तके घेऊन पुस्तकांची संख्या आता 600 च्या वर गेली आहे.


प्रथम, एकलव्य, तूलिका, राजहंस, ज्योत्स्ना प्रकाशनाची सुंदर पुस्तके तसेच चिकूपिकू, किशोर, चकमक, हायलाईट अशी मासिकेही संग्रही आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या तिन्ही भाषांतील पुस्तके उपलब्ध आहेत. अगदी लहान मुलांसाठी चित्रांवरून गोष्टी, बोर्ड बुक, तसेच कवितांची पुस्तके आहेत. अगदी लहान असल्यापासून मुले वाचत नसली तरी रंगीबेरंगी चित्र बघतात, आईबाबांकडून गोष्ठी ऐकतात. त्याचा उपयोग पुढे शालेय प्रगतीत, अभ्यासात नक्कीच होतो.
2 ते 12 वर्षे वयोगटातील अनेक मुले ह्या लायब्ररीशी जोडली गेली आहेत. वर्षाचे फक्त 100 रुपये असे माफक शुल्क वाचकांकडून आकारले जाते. एकावेळी मुलांना 2 पुस्तके घरी नेता येतात. केवळ मुलेच नव्हे तर त्यांचे पालकही या लायब्ररीच्या पुस्तकांचा लाभ घेऊ शकतात.
लायब्ररीमध्ये सर्वांनाच आवडणारा ‘storytime’ हा खास प्रोग्रॅम मुलांसाठी आयोजित केला जातो. विविध गोष्टी ऐकताना मुले अगदी रंगून जातात.
गोष्टीची पुस्तके जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावीत यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्येही Tinytales लायब्ररीची पुस्तके पाठवली जातात. तसेच तेथे मुलांसाठी खास गोष्टींचा तासही घेतला जातो.
संपूर्णपणे ‘ ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर ही लायब्ररी चालवली जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत हा पुस्तकांचा खजिना सर्वांना नक्की आवडेल.
गोष्टींची पुस्तके आनंदाने हाताळणारी, नवीन पुस्तके बघून खुश होणारी, लायब्ररी मध्ये घेऊन चल असा हट्ट करणारी, लुकलुकणारे डोळे मोठे करत, ‘आ’ वासून गोष्टी ऐकणारी मुले पाहिली की लायब्ररीचा खरा उपयोग होत आहे असे डॉ रसिका यांना वाटते.
मुलांना गोष्टींच्या जगात घेऊन जायला लायब्ररीला नक्की भेट द्या असे त्या आवर्जून सांगतात.

Tinytales किड्स लायब्ररी
सरगम बंगला, विठ्ठल नगर
माऊली हॉस्पिटल च्या मागे
संगमनेर.
वेळ सायंकाळी 5 ते 8
संपर्क 9970273841

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here