पोलीस गाढ झोपले, आरोपी जेल तोडून पळाले

0
3187

संगमनेर कारागृहात घडला धक्कादायक प्रकार

पोलीसांचे निलंबन ?

वादग्रस्त कारागृहात अनेक कारनामे
संगमनेर तालुक्यात चार पोलीस ठाणे असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात उपकारागृह आहे. या कारागृहात तीन बराकी असून त्यात नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जातात. मात्र त्यांच्या सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नाही. दरम्यान या कैद्यांना आतमध्ये तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट यासह बाहेरचे जेवन नेहमीच मिळत असते. गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडे यापुर्वी मोबाईल देखील आढळून आले आहे. या आरोपींना भेटण्यासाठी त्यांच्या नातलग मित्रपरीवाराला फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. आतमध्ये कैद्यांचे वाढदिवल विविध सोहळे बिनदिक्कतपणे साजरे केले जातात. काही दिवसांपुर्वी तर याच आरोपींकडून पोलीसांना दमदाटी, शिवीगाळ देखील करण्यात आलेली आहे. याबाबत गुन्हाही दाखल आहे. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत कुठलीही दखल घेतली नाही. तसेच सदर आरोपींनी हे गज एका दिवसात कापलेले नाही. त्यामुळे वेळोवेळी या कोठड्यांची तपासणी देखील झालेली नाही. यावरून पोलीसांची कार्यतत्परता व बेजाबदारी दिसून येते. तसेच शहरात अवैध धंदे बोकाळले असून पोलीस मात्र हप्तेखोरीत व्यस्त आहे. नुकतीच एका सहाय्यक फौजदारास आठशे रूपये घेतांना लाचलुचपत खात्याने रंगेहात पकडले आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर- संगमनेर शहर पोलीस ठाणे अंतर्गत असणार्‍या जेलच्या सुरक्षेसाठी नेमणूकीस असणारे पोलिस कर्मचारी रात्री कर्तव्य सोडून झोपा काढत असताना आतील गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी जेलचे गज तोडून पलायन केले. ही घटना पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास झोपेतून उठल्यावर पोलिसांच्या लक्षात आली. जेलमधील कैदी पळून गेल्याचे लक्षात येताच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची एकच पळापळ झाली. तर पळालेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीसांची पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. कारागृहातून कैदी पळाल्याने संगमनेर जेल प्रशासनाची इज्जत पुन्हा चव्हाट्यावर आली असून कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांवर निलंबनाची टांगती तलवार आता लटकली आहे.
संगमनेच्या कारागृह सध्या अनेक कैदी वेगवेगळ्या गुन्ह्यात कैदेत आहे. दरम्यान काल मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे शहर पोलीस ठाण्याचे राजू गोडे, घारगाव पोलीस ठाण्याचे राजेंद्र मेंगाळ, महिला पोलीस भांगरे या तीन पोलीस कर्मचार्‍यांची जेल सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली होती. झोपण्यापूर्वी सर्व आरोपींची नियमाप्रमाणे मोजणी करण्यात आली. मात्र या जेलमध्ये खून प्रकरणातील सराईत आरोपी राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी जाधव, अत्याचार प्रकरणातील रोशन रमेश दधेल (थापा), अनिल छबू ढोले या आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्याने गाणे आरत्या सुरू केल्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज कापने सुरू केले. या आरोपींचे हे नेहमीचेच आहे असे समजून नेमणूकीवर असलेले पोलिस गाढ झोपी गेले. तर इतर आरोपी देखील झोपले. मात्र हे चौघे गज कापण्यासाठी रात्रपाळी करत होते. अतिशय सावध न नियोजनाप्रमाणे त्यांनी हे गज कापले. त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार त्यांना नेण्यासाठी अगोदरच पोलीस ठाण्याच्या बाहेर येऊन थांबलेली होती. जेलचे गज कापल्यावर हे चौघे कैदी बाहेर उभ्या असलेल्या या कारमध्ये बसून पसार झाले. दरम्यान जेलमधून कैदी पळून गेल्याचे पोलिसांना समजताच त्यांची एकच धांदल उडाली. जेलच्या बंदोबस्तासाठी नियुक्त कर्मचार्‍यांनी जेलमधून कैदी पळून गेल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. यानंतर अधिकार्‍यांनी त्वरित पोलीस पथके तयार करून नाशिक, पुण्याच्या दिशेने रवाना केले. पळून गेलेले आरोपी हे गंभीर गुन्ह्यातील असल्याने त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहेत.


दरम्यान जेलमधील आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जेलमधील आरोपींकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल, हेक्सा ब्लेड होता अशी माहिती उपलब्ध झाली. हा मोबाईल त्यांना कोणी पुरवला त्यांना घेऊन जाणारे वाहन कोणाचे होते. ज्याच्या बंदोबस्ताला तीन पोलीस असतानाही हे आरोपी पळून कसे गेले याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे. पोलीस निरीक्षकांचा तगडा बंदोबस्त असतानाही आरोपी पळाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
रात्रपाळी करणारे पोलीस झोपा काढत होते. तहसीलदार हे कारागृहाचे अधिक्षक असतात. तर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यावर देखील मोठी जबाबदारी असताना ही गंभीर घटना घडलेली आहे. यामुळे या घटनेला तेही जबाबदार आहे. यामुळे पोलीस निरीक्षकांची चौकशी होण्याची शक्यता असून जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीरामपूर स्वाती भोर यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींना तात्काळ शोधण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांना दिले आहे त्यानुसार संपूर्ण पोलीस यंत्रणा या पसार झालेल्या आरोपींच्य शोधासाठी फिरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here