अतिक्रमण धारकांची दादागिरी प्रशासनाने काढली मोडीत

0
1850


जोर्वे नाका येथील अतिक्रमण केले भुईसपाट
जबर मारहाण करणारे 6 जण ताब्यात, सर्च ऑपरेशन सुरू

युवावार्ता (प्रतिनिधी
संगमनेर-
शहरातील जोर्वे नाका येथे वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी हॉर्न वाजविला याचा राग आल्याने तेथिल काही उनाड तरूणांनी जोर्वे येथील पिकअप चालकाला व त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केली. त्यावरून पेटलेल्या या वादाने नंतर दंगलीचे स्वरूप प्राप्त केले. येथील अतिक्रमण धारकांच्या वाढलेल्या गुंडगिरीने थेट तलवार, चॉपर, रॉड यासारखे घातक शस्त्रांचा वापर करून पुन्हा जोर्वेतील काही नागरीकांना जीवघेणी मारहाण केली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर प्रशासनही अ‍ॅक्शन मोडवर आले आणि आज मंगळवारी सकाळी नगरपालीका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहिम राबवत जोर्वे नाका येथील सर्व अतिक्रमन भुईसपाट करत येथे दादागिरी करणार्‍यांची दादागिरी मोडीत काढली.
जोर्वे नाका या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची नेहमीच गर्दी होत होती.

प्रवासासाठी थांबलेल्या प्रवाश्यांना, महिला मुलींना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत होते. वाहतूक जाममुळे अनेक वेळा किरकोळ वादावादी व हाणामारी होत होती. असाच प्रकार रविवारी सायंकाळी या ठिकाणी घडला होता. केवळ हॉर्न वाजविल्यावरून वाहन चालकाला मारहाण झाली. त्याची तक्रार केली म्हणून येथील दहशत पसरविणार्‍या गुंडांनी जोर्वे येथील 8 ते दहा जणांना घातक शस्त्राने बेदम मारहाण केली. त्यात सात ते आठ जण गंभीर जखमी झाले. दरमम्यान या प्रकाराने शहारातील वातावरण तणावपूर्ण बनले. तसेच संगमनेरच्या घटनेचे जोर्वेतही पडसाद पडले. ही दादागिरी व दहशत या ठिकाणी असणार्‍या अवैध अतिक्रमण व धंद्यामुळे वाढलेली होती. गोमांस तस्कर, वाळू तस्कर यांचाही हा अड्डा होता. या ठिकाणाबाबत पालिकेकडे व पोलीसांमध्ये अनेक तक्रारी होत्या. त्यातच हा गंभीर प्रकार घडल्याने प्रशासन अखेर अ‍ॅक्शन मोडवर आले. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी याची गंभीर दखल घेतली. कोणत्याही परिस्थितीत आरोपींना पाठिशी घातले जाणार नाही. तसेच येथील अवैध अतिक्रमण तात्काळ काढले जाईल अशी भुमिका घेतली. त्यातच समाज माध्यमांमध्ये या प्रकाराबाबत संताप वाढत गेल्याने प्रशासनाने कठोर कारवाईला सुरूवात केली.


येथील दहशतीचे, दादगिरीचे व समस्याचे मुळे हे अतिक्रमण असून त्यावर बुलडोझर फिरविण्याचा निर्णय प्रशासनाने रात्री घेतला. त्यानुसार आज सकाळी 8.30 च्या सुमाराल पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे पथक तर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू झाली. रविवारी रात्री पोलीसांनी येथिल अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला असता त्याला मोठा विरोध झाला होता. मात्र आज सकाळी पोलीसांनी मोठा फौज फाटा उपलब्ध करून दिल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अवघ्या काही वेळातच येथील टपर्‍या, छोटी दुकाने, हातगाडे, पाल उखडून टाकले. तसेच सावली म्हणून झाडांच्या मोठ्या फांद्या होत्या त्याही तोडण्यात आल्या. अवघ्या काही वेळातच परिसराने मोकळा श्‍वास घेतला. अतिक्रमण काढण्यास विरोध करणार्‍या किंवा अडथळा आणणार्‍यांवर तात्काळ कारवाईसाठी पथक तयार असल्याने कोणीही यावेळी विरोध केला नाही.


दरम्यान घडलेली घटना अतिशय गंभीर व दुर्दैवी असून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी सर्वच स्थरातून केली जात आहे. त्यामुळे पोलीसांनी घटनेनंतर सुरूवातीला शांतता प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न केले. व त्यानंतर आरोपींची शोध मोहिम सुरू केली. या प्रकरणी सुमारे शंभर ते 150 जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलीसांनी या अरापींच्या शोधासाठी आता मोहिम सुरू केली असून सोमवारी रात्री 6 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. लवकरच सर्व आरोपी जेरबंद केले जातील अशी माहिती पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.
दहशतखोरांना मिळाला मोठा धडा
काही राजकीय पुढार्‍यांच्या आशिर्वादाने तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा माणुसकीमुळे प्रशासन अतिक्रमण धारकांकडे अनेकवेळा दुर्लक्ष करते. मात्र त्यातून त्यांची हिमंत वाढत जाऊन संबंधीत दहशत व दादागिरी पसरविली जाते. किरकोळ कारणावरून मारहाण करणे, छेडछाड करणे असे प्रकार वारंवार केले जातात. मात्र त्याची दुष्परिणाम काय होते हे कालच्या घटनेवरून समोर आले. चार जणांनी गुन्हा केला असेल परंतू प्रशासनाने केलेल्या कारवाईत या परिसरातील हातावर पोट भरणार्‍या सर्वच छोट्या व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे व्यावसाय केवळ बंदच केला नाही तर त्यांच्या व्यावसयाचे साधने नष्ट करण्यात आली. आज येथील अनेक जण कारवाईच्या भितीने फरार आहेत. तर रोजगार बुडाल्याने कुटूंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे यापुढे अशाप्रकारचे कृत्य करण्या अगोदर आपल्या व आपल्या कुटूंबाचा विचार करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here