नऊवारीत एव्हरेस्टवर तिरंगा फडकविणारी संगमनेरची सून ठरली पहिली एव्हरेस्टवीर

0
2105

सुविधा कडलग यांचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेरच्या जवळे कडलग येथील स्नुषा आणि पुणे येथे स्थायिक असलेल्या गृहिणी सुविधा राजेंद्र कडलग यांनी वयाच्या 32 व्या वर्षी 8848 मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर (समिट) सर केला आहे. यावेळी महाराष्ट्राचा मराठमोळा साज असलेल्या नऊवारीमध्ये त्यांनी तिरंगा फडकावून संपूर्ण भारताला अभिमान वाटावा असे कार्य केले आहे.
2 चिमुकल्यांना सांभाळून त्यांनी केलेल्या या धाडसाचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. लहानपणापासूनच सैनिक बनून भारतीय फौजेमध्ये सामील होण्याचे त्यांचे उद्धिष्ट होते. काही कारणाने त्यांना आर्मीमध्ये जाता आले नाही मात्र लग्नानंतर पती राजेंद्र यांच्या आधारामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. सुरुवातीला चालणे, डोंगरी भागात पळणे, दर रविवारी सिंहगड ट्रेक करणे असा सराव त्यांनी सुरू केला. 2019 नंतर विविध मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्यानंतर आपण एव्हरेस्ट सर करायला हवा असे त्यांना वाटू लागले.


2021 साली त्यांनी 6250 मीटर उंच असलेला भारतातील लेह येथील कांग्यास्ते पर्वत सर केला. आत्तापर्यंत या पर्वतामध्ये 19 व्यक्तींनी शिखरावर जाण्याचा प्रयत्न केला त्यात 7 जणांना यश आले आणि या यशात सुविधा कडलग भारतातील एकमेव महिला होत्या. बर्फाळ डोंगरात आपण चढाई करू शकतो हे लक्षात आल्यानंतर मुळशी येथील भगवानदादा चवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एव्हरेस्टची तयारी सुरू केली.
बेस कॅम्प, कुंभु ग्लेशियर, कॅम्प 1, कॅम्प 2, चिमणी एरिया, लोहस्ते कॅम्प 4, कॅम्प 4, हिलरी स्टेप आणि शेवटी सर्वोच्च शिखर (समिट) त्यांनी सर केले. पायाला विविध प्रकारच्या जखमा, ऑक्सिजनची कमी पातळी, सोबत असलेल्या दोन गिर्यारोहकांचा मृत्यू, ढासळणारी दगडे,आधीच्या चढाईतील मृत्यू पावलेला गिर्यारोहक, सोसाट्याचा वारा, बर्फ या संकटांचा सामना करीत त्यांनी हे यश संपादन केले.


या गिर्यारोहणासाठी 35 लाखांचा खर्च येणार होता. त्यासाठी पती राजेंद्र, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे आणि पुण्यातील उद्योजकांनी मदत केली.
नऊवारीमध्ये भारताचा तिरंगा एव्हरेस्ट शिखरावर रोवण्याचे उद्धिष्ट ठेवणाऱ्या सुविधा कडलग यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले ध्येय पूर्ण केले. संपूर्ण भारतीय महिलांसाठी सुविधा कडलग यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here