पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप, तणावपूर्ण शांतता
हल्लेखोरांची ओळख पटवून कारवाई करणार – जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला
डीवायएसपी वाघचौरे यांचा अंदाज ठरला खरा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- हिंदू धर्मियांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध संगमनेरात आज अतिविशाल भगवा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर मोर्चेकरी घरी परतत असताना कोल्हार घोटी रस्त्यावरील समनापूर येथे काही दुकाने चालू असताना काही समाजकंटकांनी त्यावर दगडफेक केल्यामुळे दोन समाजात मोठा तणाव निर्माण झाला. तेथील मुस्लिम वस्तीवर काही तरुणांनी हल्ला करत गाड्यांची तोडफोड केली. काही तरुणांना मारहाण देखील करण्यात आली. यात दोन जण जखमी झाले आहे असा आरोप येथील मुस्लिम समाजाने केला आहे. दरम्यान ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले.
अभूतपूर्व असा भगवा मोर्चा संगमनेरमध्ये शांततेत पार पडल्यानंतर संगमनेर जवळील समनापुर येथे तणाव निर्माण झाल्याचे समजताच अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, देविदास ढुमणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. संगमनेरमधील मोर्चा संपल्यानंतर परत जाणाऱ्यांनी मुस्लिम कुटुंबीयांवर ही दगडफेक केल्याचे म्हटले जाते. संगमनेरहून आपल्या गावाकडे परतत असताना काही समाजकंटक घोषणा देत जात होते. या समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच दगडफेकीत चार-पाच चार चाकी वाहनांचे व तीन चार दुचाकींचे नुकसान करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर तालुक्यात अफवांचे पेव फुटले. मोर्चातून परत जाणाऱ्या तरुणांवर दगडफेक झाली असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला तर या मोर्चेकऱ्यांनी जाणीवपूर्वक आपल्या वस्तीवर हल्ला केला असा आरोप मुस्लिम समाजाने केला आहे. मात्र सत्य काहीही असो दोन समाजात वाढत असलेले वैमनस्य भविष्यात मोठ्या संकटाला निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही समाजातील सुज्ञ नागरीकांनी सामोपचाराने पुढाकार घेऊन होणाऱ्या वादावर तात्काळ पडदा टाकणे गरजेचे आहे. त्याच बरोबर पोलिसांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करुन अशा समाजविघातक शक्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
डीवायएसपी वाघचौरे यांचा अंदाज ठरला खरा
भगव्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषद घेत मोर्चा संपल्यानंतर परत जाणाऱ्यांच्या एखाद्या कृत्यामुळे दुर्घटना घडू शकते असा अंदाज वर्तवित त्या दृष्टीने बंदोबस्ताची काळजी घेतली होती. त्यानुसार समनापूर येथे घटना घडताच अवघ्या काही मिनिटात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.
हल्लेखोरांची ओळख पटवून कारवाई करणार – जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला
मोर्चा सपल्यानंतर काही टवाळखोर तरूणांनी समनापूर येथे एका समाजाच्या दुकानासमोर दुचाकी व चारचाकी गाड्या उभ्या असतांना त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे दोन्ही समाज काहीवेळ समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. या घटनेला जबाबदार असणार्या काही तरूणांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल . या घटनेत दोन जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.