१२ हजार नागरिक टँकरवर अवलंबून

नागरिकांना पाणी वाचण्याचे आवाहन गटविकास अधिकारी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढू लागल्याने पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा जपून आणि नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी केले आहे. प्रशासनाकडून शक्य ते सर्व प्रयत्न सुरू असले तरी नागरिकांच्या सहकार्याशिवाय ही समस्या प्रभावीपणे हाताळणे कठीण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या तालुक्यातील 9 गावे, 6 गावठाण आणि 15 वाड्या-वस्त्यांतील तब्बल 12 हजार 576 नागरिकांना 6 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती टंचाई कक्षाचे वरिष्ठ सहाय्यक संजय अरगडे यांनी दिली.
उन्हाची तीव्रता वाढल्याने पाझर तलाव, सिमेंट बंधारे, पारंपरिक विहिरी, बोअरवेल तसेच ओढे-नाले पूर्णपणे आटले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने उपलब्ध स्रोतही निकामी ठरत आहेत. त्यामुळे दुर्गम भागांमध्ये पाण्याची टंचाई अधिकच तीव्र झाली आहे.
सध्या डोळासणे, पिंपळगाव देपा, खरशिंदे, वरवंडी, कर्जुले पठार, चौधरवाडी, कुंभारेवाडी, गुंजाळवाडी पठार आणि धादवडवाडी या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच बांबळेवाडी, कान्हेवाडी, धुमाळवाडी, माळवाडी, कनसेवाडी, दत्तवाडी, ठाकरवाडी, काठवनवाडी, कोंबडवाडी आणि ऐठेवाडी या वाड्या-वस्त्यांमध्येही टँकरने नागरिकांची तहान भागवली जात आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवीन मागण्या देखील वाढू लागल्या आहेत. पोखरी बाळेश्वर येथील 5 वाड्या, साकूरमधील तासकरवाडी आणि अकलापूर येथील पत्र्याचीवाडी येथे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आले असून ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

एप्रिल आणि मे हे दोन महिने तालुक्यासाठी अत्यंत निर्णायक मानले जातात. विशेषतः पठार भागात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होते. वर्षानुवर्षे ही समस्या कायम असतानाही ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात अपयश येत असल्याने नागरिकांना दरवर्षी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा या संदेशासह प्रशासनाने नागरिकांना जबाबदारीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.





















