नागरिक, शेतकरी त्रस्त, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरासह उपनगरांमध्ये मोकाट जनावरांचा संचार दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य रस्ते तसेच इंदिरानगरसारख्या अरुंद गल्ल्यांमध्येही ही जनावरे पन्नास ते शंभरच्या जथ्थ्याने फिरताना दिसत आहेत. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी तसेच सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत ही जनावरे रस्त्यांवर ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा अचानक रस्त्यावर आलेल्या जनावरांमुळे अपघात टळता टळता राहिल्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे.

दरम्यान, शहरालगतच्या शेती क्षेत्रातही या मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. शेतकर्यांच्या पिकांमध्ये घुसून ही जनावरे मोठे नुकसान करत असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्यांचे कंबरडे मोडत आहे. जर्सी गोर्हे, भाकड गायी तसेच वृद्ध जनावरांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे निरुपयोगी जनावरांची संख्या वाढत असल्याचेही काही नागरिकांचे मत आहे. मात्र, यावर कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने ही जनावरे रस्त्यावरच भटकत आहेत. त्यातच काही नागरिक तथाकथित पुण्य मिळवण्याच्या उद्देशाने या जनावरांना भाकरी-चपाती खाऊ घालत असल्याने परिस्थिती आणखी बिघडत आहे. तज्ञांच्या मते, हे अन्न जनावरांसाठी योग्य नसून त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. हिरवा चारा न मिळाल्याने त्यांच्या शेणातून उग्र वास येत असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून अपेक्षित त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

गोप्रेमी संघटनांनीही केवळ कत्तलखाने बंद करण्यापुरते मर्यादित न राहता अशा मोकाट जनावरांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शहरात गोशाळांची उभारणी, मोकाट जनावरांची नोंदणी, त्यांचे संगोपन व पुनर्वसन यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच जनावरांना अयोग्य अन्न देणार्यांवर नियंत्रण ठेवणे, शेतकर्यांना संरक्षणात्मक उपाययोजना उपलब्ध करून देणे आणि नगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. एकूणच, मोकाट जनावरांचा प्रश्न हा केवळ धार्मिक किंवा भावनिक न ठेवता सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभीर्याने हाताळण्याची वेळ आता आली आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात ही समस्या आणखी विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.





















