सफायर बिझनेस एक्स्पोचे शानदार उद्घाटन
युवावार्ता (प्रतिनिधी)
नवीन उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ग्राहकांना नवीन उद्योगाची, वस्तूंची माहिती व्हावी व त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात या हेतूने मागील 15 वर्षांपासून संगमनेरच्या चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार येथील लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने भव्य सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात येत असते. संगमनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी एक्स्पोचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र अशा भव्य दिव्य एक्स्पोचे आयोजन करणे मोठे कठीण काम असते. लायन्स सफायरचे प्रकल्प प्रमुख एम.जे.एफ गिरीष मालपाणी, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिंवसरा, प्रकल्प प्रमुख झोन चेअरमन रोहित मणियार, अध्यक्ष उमेश कासट, सेक्रेटरी कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी व त्यांच्या टीमने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे असे गौरवोद्गार ला. श्रेयस दिक्षित यांनी काढले
.
मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी लायन्स क्लब संगमनेर सफायरला यावेळी शुभेच्छा दिल्या. सफायरच्या अनेक उपक्रमांची मी साक्षीदार असून अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केलेली आहेत असे त्यांनी नमूद केले. पुढील सफायर आयडॉल आणि सफायर मॅरेथॉन या उपक्रमांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. बिझनेस एक्स्पोला संगमनेरांचा उदंड प्रतिसादही मिळत असतो. अबाल वृध्दांसह महिला मोठ्या संख्येने या एक्स्पोमध्ये खरेदीचा, खाण्याचा व खेळण्याचा आनंद लुटत असतात. यावर्षीही सफायर बिझनेस एक्स्पो 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधी पर्यंत संगमनेरकरांसाठी खुले करण्यात आले आहे.
लायन्स क्लबच्या वतीने येथील उदयोन्मुख उद्योजक व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार्या या उपक्रमात सफायरने व्यापारवृध्दी, व्यवसायाप्रती कटीबध्दता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधला आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा व ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू, सेवांची माहिती देणारा, विविध खाद्यपदार्थांच्या चवींची लज्जत देणारा सफायर बिझनेस एक्स्पो अशी ओळख राज्यात बनली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे हा बिझनेस एक्स्पो सुरु आहे. 26 जानेवारी पर्यंत हा एक्स्पो चालणार असून आत्तापर्यंत अनेक ग्राहकांनी याठिकाणी खरेदीचा, फूड फेस्टिव्हलचा व फनफेअर गेम्सचा आनंद लुटला आहे. या एक्स्पोमध्ये नामांकित उद्योजकांनी आपले स्टॉल लावले आहेत. कोरोना काळामध्ये बिझनेस एक्स्पोसह यात्रा-जत्रा बंद असल्याने पाळणे, बे्रकडान्स, वॉटर बोट, रेल्वे या खेळण्यांना लहान मुले मुकली होती. एक्स्पोच्या निमित्ताने संगमनेरकरांना ही मोठ संधी मिळाली. मोठ्या प्रमाणावर महिला मुले या एक्सपोचा आनंद लुटत आहेत. तरी या सफायर बिझनेस एक्स्पोचा सर्व संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गिरीश मालपाणी व त्यांच्या टीमने केले आहे.
सफायर बिजनेस एक्स्पोत 20 ते 26 जानेवारी दरम्यान ग्राहकांना खरेदी आणि मेजवाणीची सुवर्णसंधी मिळणार आहे. लहान मुलांसाठी खेळ, मनोरंजन, महिलांना खरेदीसाठी खास सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सकाळी 10 ते रात्री 9.30 पर्यंत सुरू राहणार आहे. यात 10 ते 4 पर्यंत मोफत प्रवेश तर सायंकाळी 4 नंतर महिलांना 10 तर पुरुषांना 20 रुपये शुल्क असणार आहे. या एक्स्पोसाठी संगमनेरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने पार्किंगची गैरसोय टाळण्यासाठी शक्यतो रिक्षाचा वापर करावा आणि या एक्स्पोचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.