संगमनेर उपविभागातून दोन महिन्यात 48 जणांचे तडीपारीचे प्रस्ताव

0
2097

वाढत्या गुन्हेगारीला पायबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचलली कठोर पाऊले

संगमनेर
वाढत्या गुन्हेगारीला पायबंध घालण्यासाठी संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. जून-जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तब्बल 48 गुन्हेगारी व्यक्तींच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
का केली कारवाई: प्रस्तावित प्रस्तावानुसार आगामी काळामध्ये येणारे सण उत्सव शांततेमध्ये पार पडावे. त्याचप्रमाणे संगमनेर पोलीस उपविभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या, सुरक्षेच्या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागाकडून कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी रेकॉर्डवरील या सर्व गुन्हेगारांविरोधात विविध कारवाया करण्यात येत आहेत. त्यापैकी ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.


प्रत्येकाच्या नावावर पाच पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद संगमनेर उपविभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, आश्वी पोलीस स्टेशन, घारगाव पोलीस स्टेशन, अकोले पोलीस स्टेशन व राजुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेली आहे. पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या ज्या गुन्हेगारांनी सन 2022 व 2023 मध्ये पुन्हा गुन्हे केलेले आहेत. अशा सर्व गुन्हेगारांची माहिती अद्यावत केली आहे.
यातील प्रत्येक व्यक्तीविरुद्ध किमान पाच किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. प्रस्तावित व्यक्तींचा संपूर्ण गुन्हेगारी अभिलेख एकत्रित करून सदरचे प्रस्ताव बनवण्यात आले आहे. याच आधारे गेल्या महिन्यात 33 गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आले आहे.


नव्याने 15 प्रस्ताव: त्या पाठोपाठ या महिन्यात देखील यात आणखी वाढ झाली असून नव्याने 15 जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, कलम 56, कलम 57 अंतर्गत सदरचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अर्थात गँग तडीपारीचे दहा व्यक्ती विरोधात दोन प्रस्ताव, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अंतर्गत पाच जणांविरोधात 5 प्रस्तावांचा समावेश आहे. या सर्वांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे.
शहर पोलीस ठाण्यातून सर्वाधिक प्रस्ताव: यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून 10, तालुका पोलीस ठाण्यातून 2, अकोले पोलीस ठाण्यातून 2 व घारगाव पोलीस ठाण्यातून एका व्यक्ती विरोधात हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here