जिल्हा अर्बन बँकेचा परवाना रद्द

0
1461

संचालकांच्या नावाने शिमगा,अर्बन बँक ठेवीदारांचा बुधवारी मोर्चा

युवावार्ता (प्रतिनिधी)
अहमदनगर- रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केलेल्या नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी येत्या बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर सकाळी 11 वाजता मोर्चा नेण्याचा निर्णय रविवारी घेतला. येथील खाकीदास बाबा मठात झालेल्या ठेवीदारांच्या पहिल्याच बैठकीत बँक बुडवणार्‍या संचालकांच्या नावाने शिमगा करण्यात आला. या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धारही यावेळी करण्यात आला.


113 वर्षाची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना मागील चार ऑक्टोबर रोजी रिझर्व बँकेने रद्द केला आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार व कामकाज बंद झाले आहे. बँकेच्या पाच लाखा आतील ठेवीदारांना दोन टप्प्यात त्यांचे पैसे मिळाले असले तरी यापैकी राहिलेल्या ठेवीदादांचे तिसर्‍या टप्प्याचे 42 कोटी मिळालेले नाहीत. याशिवाय पाच लाखांवरील 1600 वर ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये बँकेत अडकलेले आहेत. त्यामुळे हे पैसे मिळण्याचे नियोजन करण्यासाठी रविवारी सायंकाळी ठेवीदारांची बैठक झाली. यावेळी येत्या बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नगर अर्बन बँकेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले. कोणी मुला-मुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी व अन्य विविध कारणासाठी म्हणून बँकेत विश्‍वासाने पैसे ठेवले, परंतु बँकेवर विश्‍वस्त म्हणून आलेल्या संचालकांनी या पैशांची मनमानी लूट केली. त्यामुळे बँक अडचणी आली. चुकीचे कर्ज वाटप केल्याने 800 कोटी वर येणे बाकी आहे. हे पैसे वैसे वसूल होणार कधी व ठेवीदारांचे पैसे मिळणार कधी, असे विविध प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आले. स्वतःवरील आपत्ती सांगताना काही महिला ठेवीदारांच्या डोळ्यात पाणीही आले. बँक बुडण्यास कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांची प्रॉपर्टी जप्त करून व ती विकून ठेवीदारांचे पैसे दिले गेले पाहिजे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. तब्बल 113 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक बुडली असून ही बँक बुडवण्यास कारणीभूत असलेल्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी समवेत घेऊन फिरू नये, असे आवाहन ठेवीदारांनी यावेळी केले. पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्यासह अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीसमवेत हे दोषी संचालक व त्यांचे समर्थक असल्याने पोलिसांवर त्यांच्यावर कारवाई करण्यास मर्यादा येतात, असा दावाही यावेळी ठेवीदारांनी केला. यासंदर्भात लवकरच पालक मंत्री यांची भेट घेण्याचेही ठरवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here