दुधगंगा पतसंस्था घोटाळ्यातील ४४ मालमत्ता जप्त

0
107

अध्यक्ष, प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांचा समावेश

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था व भ्रष्ट पदाधिकारी-अधिकार्‍यांच्या विरोधात शासनाने कारवाई केली आहे. ठेवीदारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या पतसंस्थेची आणि गैरव्यवहारात सामील असलेल्या पदाधिकार्‍यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या आदेशावरून प्रांताधिकारी उपविभागीय दंडाधिकारी अरुण उंडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, संस्थेचे अध्यक्ष, प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी व आणखी काही लोकांच्या मालकीच्या 44 स्थावर मालमत्तांवर कब्जेदार सदरी ‘महाराष्ट्र शासन’ नाव लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पतसंस्थेची संबंधित गैरव्यवहार करणार्‍या लोकांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात ठेवीदारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांनी ठेवीदारांना मुदतीअंती व्याजासह रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारल्या होत्या, परंतु मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केली. या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाची खात्री पटली आहे. ही संस्था ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ आहे. इतकेच नव्हे तर ठेवीदारांच्या पैशातून पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या नावे मालमत्ता संपादित केल्याचेही समोर आले आहे.

सात-बारावर महाराष्ट्र शासनाचे नाव


महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 मधील कलम 4 आणि 5 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये सुकेवाडी, समनापूर, खंदरमाळवाडी, संगमनेर बुद्रुक, वडझरी, वडगाव लांडगा, घुलेवाडी आणि देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील शेतजमिनींचा समावेश आहे. या मालमत्ता प्रामुख्याने दूधगंगा पतसंस्था, पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दामोधर कुटे, विमलबाई भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, भाऊसाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, उत्तम शंकर लांडगे, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल भाऊसाहेब कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, लहानु गणपत कुटे आणि अजित कृष्णराव कदम यांनी विक्री केलेले सध्याचे मालक शुभम शेखर चंगेडिया यांच्या नावावर किंवा त्यांच्या हिश्श्याच्या आहेत. या प्रशासकीय कारवाईमुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here