संगमनेर (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर उपविभागात उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत रामदास मंगरुळे यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दल महसूल विभागाकडून त्यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड झाली आहे. 1 ऑगस्ट 2022 रोजी महसूल दिनानिमित्त त्यांचा महसूल विभागाकडून गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संगमनेर तहसील विभागातील नायब तहसीलदार गणेश शंकर तळेकर यांची नायब तहसिलदार संवर्गातून उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तसेच संगमनेर तहसील मंडळातील कोतवाल संवर्गातून विकास सुभाष वर्पे यांची निवड झाली आहे. महसूल मंडळातील अधिकारी व कर्मचार्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सन्मतान होत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
01 ऑगस्ट 2021 ते 31 जूलै 2022 या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा महसूल दिनी गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यातून केवळ उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची एकमेव उपजिल्हाधिकारी संवर्गातून उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तसेच नायब तहसिलदार म्हणूनही गणेश तळेकर यांची एकमेव निवड झाली आहे. संगमनेर उपविभागात या वरीष्ठ अधिकार्यांनी शासकीय योजनांची अंमलबजावणी करुन सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला. तसेच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविल्या याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे. या निवडीबद्दल संपूर्ण महसूल विभागातून या अधिकार्यांचे व कर्मचार्यांचे कौतुक होते आहे. दरम्यान डॉ. मंगरूळे यांच्यासह कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जिल्हाधिकारी कार्यालयात स्वि. सहाय्यक पल्लवी खेडकर, अव्व्ल कारकून रामकिसन नलवडे यांचीही निवड झाली.