अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर संगमनेरमध्ये सत्ता परिवर्तन
संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी): चाळीस वर्षे सत्तेत असलेल्या प्रस्थापितांविरोधात काम करणे सोपे नव्हते. सत्तापालट होईल यावर आमचा विश्वास होता. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर संगमनेरमध्ये सत्ता परिवर्तन झाले. या परिवर्तनासाठी अनेक ज्येष्ठ नेते आणि युवक कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. त्या संघर्षाचे चीज झाले. संगमनेर विधानसभा मतदार संघातून आ. अमोल खताळ यांच्या यशाने संगमनेरच्या युवा कार्यकर्त्यांना उभारी मिळाली आहे असे भाजयुमो चे जिल्हा सरचिटणीस रोहित चौधरी यांनी सांगितले आहे. अमोल भाऊंसारख्या तरुण कार्यकर्त्याला संगमनेरमध्ये उमेदवारी करण्याची संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचं सोनं करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. समाजातील अतिसामान्य लोकांपर्यंत स्वतःला पोहोचवले. खर्या अर्थाने जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई झाली. सुजय दादा विखे यांच्या सभांचा झंझावात झाला. डॉ. विखे वगळता इतर कुठल्याही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. विविध पातळीवर मोठ्या प्रमाणात संघर्ष करून या निवडणुकीला आम्ही सर्व शेवटपर्यंत सामोरे गेलो.
सर्वसामान्य लोकांपर्यंत केलेला जनसंपर्क, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, कार्यकर्ता या भावनेने केलेले काम ही आमच्या उमेदवाराची जमेची बाजू राहिली असेही रोहित चौधरी म्हणाले. दुसर्या बाजूला चाळीस वर्षे आमदार राहिल्यामुळे,अनेक वर्ष मंत्रिपद भोगल्यामुळे, तालुक्यातील साध्या साध्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, ठेकेदारशाहीमुळे, वर्षानुवर्ष लोकांना गृहीत धरल्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा उद्रेक झाला. या उद्रेकाने सर्वसामान्य जनतेने आपली वाचा मतदानाच्या रूपाने फोडली असेही रोहित चौधरी यांनी पत्रकात म्हटले आहे. आ. अमोल भाऊ खताळ यांनी घेतलेली मेहनत, विखे पाटील कुटुंबियांनी दिलेले पाठबळ, तरुण कार्यकर्त्यांनी केलेले प्रामाणिक कष्ट आणि प्रयत्न, सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली निवडणूक, हिंदुत्व, लाडक्या बहिणीचे प्रेम, सरकारच्या योजनांबाबत लोकांमध्ये असलेली सकारात्मक भावना, गावोगावी खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवर उमेदवार व कार्यकर्ते पोहोचल्यामुळे आम्ही विजयापर्यंत पोहोचू शकलो. सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि तरूण कार्यकर्त्यांमुळे हा विजय सुकर झाला. पुढील 5 वर्षात संगमनेर नक्कीच विकासाची उंची प्राप्त करेल असे चौधरी यांनी सांगितले.