अस्वच्छता यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायतीपैकी एक असणार्या गुंजाळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असणार्या अनेक उपनगरात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. रस्ते, पाणी या मुलभूत समस्या व्यतिरिक्त कचरा, अस्वच्छता यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लाखो रुपयांचा कर जमा करणार्या ग्रामपंचायतचे या नागरी समस्येकडे होणार्या दुर्लक्षामुळे उपनगरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
संगमनेर शहरालगत व पुणे- नाशिक महामार्गालगत असल्याने गुंजाळवाडी गावाचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरालगत मात्र गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण होत आहे. येथील रहिवाश्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा केला जात असताना त्यांना मुलभूत सुविधा मात्र पुरविल्या जात नाही. येथील ऐश्वर्या पेट्रोल पंपामागील वसाहत, केशव नगर, राहणे मळा यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कचर्याचे ढिग पडलेले पहायला मिळतात. या कचर्यामुळे या परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला असून साप, उंदीर, मच्छर, कुत्रे यांच्या भीतीने नागरिक त्रस्त आहेत. सोबतच या घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून लहान मुले, जेष्ठ नागरिक आजाराला बळी पडत आहेत.
त्यामुळे गुंजाळवाडी ग्रामपंचायतने या नागरी समस्येकडे लक्ष देऊन त्यांची या होणार्या कचर्यापासून सोडवणूक करावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.