भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार

0
2083

अत्याचार व जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

संगमनेर
होमहवन करून तुमच्या कुटुंबाची अडचण सोडवतो असे सांगून एका भोंदू बाबाने महिला घरी एकटी पाहून तिच्यावर उदीसदृश्य पदार्थ टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून भोंदू बाबा विरोधात अत्याचार व जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आश्वी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.


सादतपूर शिवारात उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरुन एक कुटुंब आले आहे. येथे हे कुटुंब दुसर्‍याची शेती वाट्याने करुन प्रपंच चालवत होते. परंतू या कुटुंबाला मागील काही दिवसांपासून अनेक घरगुती अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नातेवाईकाच्या माध्यमातून ओळख झालेल्या शिवाजी पांडे (रा. शिरापूर, ता. संगमनेर) याने या कुटुंबाला होमहवन करुन तुमची अडचणीतून सुटका करुन देतो असे सांगितले. त्यामुळे या भोंदू बाबांबरोबर या कुटुंबाची ओळख वाढली होती.
याच ओळखीचा फायदा घेत भोंदू बाबा शिवाजी पांडे हा सोमवार दि. 31 जुलै रोजी सादतपूर परिसरात आला होता. यावेळी घरातील महिलेचा पती हा कामानिमित्त शेतात गेल्याचा फायदा घेऊन या भोंदू बाबाने घरात एकट्या असलेल्या महिलेच्या अंगावर उदीसदृष्य पदार्थ टाकून या महिलेच्या मनाविरुद्ध अत्याचार केला.
याबाबत सदर पिडीत महिलेने आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समुळ उच्चाटन करणे अधिनियम 2013 कलम 3(1), (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी तात्काळ हवालदार बाबासाहेब पाटोळे, पोलीस नाईक विनोद गभिंरे, ढोकणे, पथवे व वाघ यांना योग्य त्या सुचना देऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले होते. यावेळी मोठ्या शिताफीने या पोलीस पथकाने शिरापूर येथे मध्यरात्री 3 वाजता सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे.
मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने 4 ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here