आवश्यक बदल करणार
श्रेय घेणाऱ्यांनी सहभाग स्पष्ट करावा
निळवंडे धरणासह उल्लेखनीय कामगिरीची आठवण
“तुमच्यासाठी त्यांच्याशी संघर्ष केला, यापुढे देखील करत राहणार“
दंगलीचे शहर म्हणून संगमनेरची प्रतीमा पुसली
संगमनेर (दैनिक युवावार्ता)- संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला. निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर आज संगमनेररांशी जाहीर संवाद साधला. या मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आपल्यावरील सर्व आरोपांना आक्रमकपणे उत्तर देत झालेल्यां प्रत्येक चुका दुरुस्त करु पण संगमनेररांचा फुललेला संसार उघड्या डोळ्यांनी उजाड होतांना पहाणार नाही. पुन्हा संघर्ष करु त्यासाठी सखाराम – तुकारामांनी गावातील आपापसातील मतभेद तातडीने थांबवा. गटबाजी संपवून येथे येऊ पहाणारे आक्रमण रोखण्यासाठी एकजुटीने कामाला लागा. माझा लढा स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी असल्याचे सांगत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला आणि आपल्याला धक्का बसला. आपल्याला मताधिक्य किती राहील याचा विचार आपण करत होतो. हे सगळं होत असताना पराभव झाला. हा धक्का बसला हे मान्य करावं लागेल. 1985 पासून एक वेगळ्या पर्वाची आपण सुरुवात केली. संगमनेर तालुक्याची वेगळी संस्कृती आपण निर्माण केली. चाळीस वर्ष आपण मला संधी दिली. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला विधानसभेत पाठवले. यावेळी देखील तुम्ही काम करत होतात, मी राज्यात फिरत होतो. मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. पण नेमकं काय घडलं हे आजही समजत नाही. प्रत्येक जण वेगवेगळे कारण सांगत आहे. सगळ्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. जे दोष असतील ते निश्चित दूर करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मी निळवंडे धरणाचे सुरू केलेलं काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो. पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून पहिल्याच बैठकीत निळवंडे धरणाच्या कामाला हात घातला. कृषी, शिक्षण व महसूल यांच्यासह अनेक खाते मी यशस्वीपणे सांभाळली. महसूल खातं माझ्याकडे असताना अनेक महत्त्वाचे निर्णय मी घेतले, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांच्याकडे बघत फडणवीस यांच्याकडे कधी गेला तर तू तर त्यांना विचार ते सुद्धा मान्य करतील, असे म्हटले.
निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी आज अनेक जण पुढे येताय. जुन्या पिढीला सगळा इतिहास माहिती आहे. मात्र तरुण पिढीला ते अजूनही माहित नाही. 1985 मध्ये काय परिस्थिती होती आणि आज काय याचा विचार केला पाहिजे. निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी आज अनेक जण पुढे येत आहे. मात्र त्यांचा सहभाग काय हे एकदा त्यांनी सांगावे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. तर, शहराचा पाणी प्रश्न मी कायमचा सोडवला. थेट धरणातून पाईपलाईन शहरासाठी आणली. मात्र, ज्यांनी त्या दिवशी फटाके वाजवले ना त्यांनी सुद्धा आपण आणलेलंच पाणी घरात गेल्यावर पिले असेल. थोडी तरी कृतज्ञता ठेवायला हवी, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातून कमी मताधिक्य मिळाल्याने भाषणातून नाराजी व्यक्त केली.
*माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न*
मी राजकारण करताना जातीय भेदभाव कधीच केला नाही. 1985 च्या अगोदर दंगलीचे शहर म्हणून संगमनेरची ओळख होती. मात्र मी आमदार झाल्यानंतर कधीही ते घडलं नाही. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन पुढे गेलो आणि दंगलीचे शहर ही प्रतिमा पुसली. मग विरोधकांना हे का दिसत नाही? माझी मुस्लिम धार्जिणा म्हणून प्रतिमा बनवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. मात्र मी गणपती उत्सव जोरदार केला, अनेक गावात मोठमोठे सप्ताह भरवले, तालुक्यातील धार्मिक स्थळांचा विकास केला, शहरातील पहिल्या गणपतीची मानाची आरती सलग २५ वर्षे केली, हिंदू धर्माचे प्रत्येक कर्तव्य बजावले हे कुणाला कधीच का दिसलं नाही. सगळ्या समाजाला घेऊन पुढे चाललो. हे का नाही दिसले? दिवाळी पहाट, कवी अनंत व्याख्यानमाला यासह अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम दरवेळी मीच होतो हे तीथे कधीच दिसले नाही. तरीही माझ्यावर हिंदूद्वेष्टे म्हणून टिका केली. माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न केवळ राजकारणासाठी केला जातोय. काही बाहेरच्या मंडळींचा संगमनेर तालुक्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता.
*बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना इशारा*
प्रवरा कारखान्याने आपल्या तालुक्यात गट ऑफिस सुरू केलं. आता यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर देखील राहील. नवीन आमदार झाल्यानं त्यांना ही हिंमत झाली आहे. नवीन झालेला आमदार हे त्यांचे हत्यार आहे. काही मंडळी मला म्हणत होती की तुम्ही तिकडे कशाला गेले. मात्र त्यांनी मंत्री (विखे पाटील) झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या. मग माझ्याकडे पर्याय नव्हता. मी हा अन्याय सहन करू शकत नाही. त्यानंतर तिकडे गेलो आणि गणेश कारखाना ताब्यात घेतला. तीकडे गेलो तरी चांगले करण्यासाठी गेलो कुणाचा संसार मोडण्यासाठी नाही. मी स्वतः यांच्या विरोधात खंबीरपणे उभा Arvind आहे. काही झालं तरी देखील मी उभा राहणार, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना दिला.r