करारी, स्वाभिमानी, निरपेक्ष सहकार भूषण सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थाेरात (दादा)

पुण्याहून नाशिकला किंवा नाशिकहून पुण्यास जाताना संगमनेर तालुक्यातून जावे लागते. महामार्गाने जातं असताना दोन्ही बाजूस शेती, उद्योगाचे जाळे आणि मोठ्या इमारती दिसतात. संगमनेरचे समृद्ध स्वरूप दिसते. संगमनेच्या समृद्धीचे स्वप्न पाहणार्‍या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.त्यानिमित्त लढवय्ये भाऊसाहेब थोरात वाचकांना कळावेत असा या लेखाचा उद्धेश आहे.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे ही भाऊसाहेब थोरातांचे जन्मगाव. संतूजी गंगाराम थोरात हे वडिलांचे नाव तर सीताबाई हे आईचे नाव. गावची पाटीलकी व मोठे शेतकरी कुटुंबात भाऊसाहेब थोरातांचा 12 जानेवारी 1924 रोजी झाला. भौतिक समृद्धी असली तरी आर्थिक समृद्धी जेमतेम असायची. गाव नेतृत्वाची परंपरा थोरात घराण्यात असल्याने मॅट्रीकपर्यंत शिक्षण झालेले. भाऊसाहेब थोरात 1953 साली जोर्वे सहकारी सोसायटी चेअरमन झाले. नेतृत्वाचा वारसा स्विकारुन पुढे भाऊसाहेब थोरातांनी 1956 साली सुपरवायझर युनियनची स्थापना केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात अहमदनगर जिल्हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. कॉ. दत्ता देशमुख, अच्युतराव पटवर्धन, प्रसिद्ध वकील चंद्रभान बालाजी आठरे, कॉ. पी. बी. कडू पाटील, कॉ. राम नागरे यासारखे दिग्गज पुढारी अ. नगर जिल्ह्यात असल्याने भाऊसाहेब थोरातांवर कम्युनिस्ट पक्ष्याचा प्रभाव होता. स्वातंत्र्याचा चळवळीत भाऊसाहेब थोरातांनी कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हूणन अनेक आंदोलने केली. अनेक वेळा तुरूंगवास सहन केला. सिन्नर तालुक्यातील पाडळी गावचे भूमिपुत्र व देशाचे कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे व भाऊसाहेब नातेवाईक होते परंतू त्यापेक्षाही त्यांची वैचारिक मैत्री घट्ट होती. नाशिकच्या तुरुंगात भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे एकत्रीत असताना कम्युनिस्ट विचारसरणीचा फार मोठा परिणाम त्यांच्यावर झाला. ते अण्णासाहेब शिंदेंना राजकीय गुरु मानायचे. संगमनेरला माध्यमिक शिक्षणासाठी पेटिट विद्यालयात असताना भाऊसाहेब थोरातांचा राष्ट्र सेवा दल शाखेत सक्रिय होते.


थोर समाजसेवक व गरिबांचे वकील साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्याशीही त्यांचा निकटचा सपंर्क होता. त्यानिमित्त संगमनेर अकोले तालुक्यातील तत्कालीन राजकारण व सामाजिक चळवळी भाऊसाहेंबानी समजावून घेतल्या. कार्यकर्त्या म्हणून 1962 पर्यंत भाऊसाहेब थोरातांनी कम्युनिस्ट पक्ष्याचे काम केले मात्र नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंराव चव्हाणांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव भाऊसाहेब थोरातांवर पडला व त्यांनी परिस्थितीनुरुप यशवंतराव चव्हाण साहेबांचे नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष्यात प्रवेश केला. साधारणतः 15 वर्ष स्वातंत्र्य चळवळीसाठी दिल्यानंतर स्वातंत्र्यानंतर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी वाहून घेतले. तत्कालीन पुढारी के. बी. दादा देशमुख, कॉ. दत्ता देशमुख, बी. जे. खताळ पाटील, पद्मश्री कॉ. विठ्ठलराव विखे पाटील, अण्णासाहेब शिंदे, अ‍ॅड. रावसाहेब शिंदे, धर्माजी पोखरकर यांच्या सहभागातून व विचारांच्या दिशेने 1959 साली संगमनेर तालुका शेतकी संघ या सहकारातील मातृसंस्थेची स्थापना केली. संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी संपूर्ण तालुक्याच्या विकासाची नवी मांडणी केली.
तालुक्यातील कोरडवाहू जमीन, गरिबी, अज्ञान आणि दुष्काळ या समस्याशी सामना करण्यासाठी जमीन सपाटीकरण, सहकारी पाणी पुरवठा योजना, ऊस पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड, दूध व्यवसायास प्रोत्साहन गावोगाव सहकारी सोसायटी, पतसंस्था, सहकारी दूधसंस्था स्थापना करून दुष्काळी असलेला संगमनेर तालुका स्वावलंबी व समृद्ध बनविला. यासाठी तालुक्यातील जाणकर व विश्‍वासू सहकारी मिळवून संगमनेर सहकारी दूध संघ, संगमनेर साखर कारखाना, संगमनेर शेती व शिक्षण विकास संस्था अमृतवाहिनी बँक, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज, या सारख्या तालुका स्तरावरील शिखर संस्थांची स्थापना करून शेतीसाठी कर्जपुरवठा, इंजिनीरिंग, मेडिकलच्या शिक्षणाची व्यवस्था, मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती करून संगमनेरची बाजारपेठ श्रीमंत बनविली.


सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्वभावाने करारी, विचाराने शिस्तीचे व वृत्तीने निरपेक्ष होते. त्यांनी सहकाराचा उपयोग सर्वांगीण विकासासाठी गरजेनुसार काटकसरीने केल्याने संगमनेरच्या सर्व संस्था कर्जमुक्त असून स्वावलंबी आहे. दसरा -दिवाळी निमित्त संगमनेर बाजारपेठेत विविध मार्गाने 250 कोटी रुपये खरेदी विक्री निमित्ताने फिरतात यावरूनच संगमनेरच्या समृद्धीची कल्पना येते.
समृद्ध संगमनेरचे शिल्पकार असलेले भाऊसाहेब थोरातांनी अ. नगर जिल्हा सह. बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅक चे अध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे काम केले आहे. शेती आणि शेतकरी विकास हा भाऊसाहेबांचा श्‍वास आणि ध्यास होता. सहकाराच्या निकोप वाढीसाठी त्यांनी अतिशय कडक शिस्तीने कारभार चालविला. हीच शिस्त त्यांचे सुपुत्र व राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरातांनी पुढे जोपासली आहे.
आदरणीय भाऊसाहेब थोरातांना तालुक्यात व सर्वत्र दादा म्हणून संबोधले जायचे. दुष्काळी संगमनेर तालुक्याचे नंदनवन करणारे आदरणीय दादाची अखेरच्या पर्वातील ओळख म्हणजे दंडकारण्य अभियान आहे. संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी, शैक्षणिक, शासकीय, सेवाभावी संस्थांना एकत्र करून संगमनेरचे उघडे डोंगर हिरवे करण्यासाठी, मोकळ्या पडीक जमिनी वृक्षारोपणाने हिरव्या करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत दंडकारण्य अभियान कार्यान्वित ठेवले. अमृत उध्योग समूह, जयहिंद लोकचळवळ, संगमनेरचे नेतृत्व व माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात माजी आ. डॉ. सुधीरजी तांबे, संगमनेरच्या प्रथम नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, युवा नेतृत्व आ. सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह हजारो नागरिक दंडकारण्य अभियानात सहभागी असल्याने या अभिमानाची नोंद जागतिक विक्रमामध्ये झाली आहे. सामूहिक विकासाच्या लोकभावनेने संपूर्ण तालुका हेच कुटुंब समजून आयुष्यभर सहकाराचा ध्यास घेऊन समृद्ध सहकार सृष्टी निर्माण करणारे भाऊसाहेब थोरातांचे कार्य कस्तुरीचा सुंगधाप्रमाणे व चंदनाच्या पावित्र्याप्रमाणे सदैव स्मरणात राहील.
24 मार्च 2010 रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांचे निधन झाले. तरी 14 वर्ष होऊनही संगमनेरकर, जिल्हा त्यांना विसरला नाही हेच त्याच्या कार्याचे मोल आहे. त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

किसन भाऊ हासे, अध्यक्ष
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख