संगमनेर तालुक्यातील खळी गावात घडली घटना
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – बालविवाह प्रथा बंद होऊन आज अनेक वर्षे लोटली. जनजागृती आणि कायदा यामुळे अनेक बालकांची यातून सुटका झाली. परंतु आजही काही पालक आपल्या बालकांच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधून त्यांचे आयुष्य धोक्यात टाकत आहेत. अशीच घटना पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यातील खळी गावात घडली. एका पंधरा वर्षीय बालिकेचा विवाह लावणार्या मुलगी आणि मुलाकडील पालक व लग्न लावणार्या पुरोहितासह पाच जणांविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना गणेश नागरे, गणेश सखाराम नागरे, अरविंद दत्तू घुगे, मंदा दत्तू घुगे, दत्तू सुखदेव घुगे (सर्व राहणार खळी, तालुका संगमनेर) आणि पांडुरंग भानुदास दिमोटे (पुरोहित) (रा.राहुरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.हा बालविवाह दिनांक 10 मे 2024 रोजी मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत गुपचूप उरकण्यात आला होता.
याची खबर त्या बालिकेच्या नातेवाईकाला लागताच त्याने या घटनेची माहिती खळी येथील ग्रामसेवक अनिल माधव वाणी यांना दिली तसेच लग्नाचे फोटो व इतर पुरावे सादर केले. त्यानंतर गावातील बालविवाह समिती सदस्य मच्छिंद्र पाराजी चकोर, पोलीस पाटील) राधिका दिगंबर घुगे, अंगणवाडी सेविका) विलास गजानन वाघमारे, सरपंच) राजेंद्र नामदेव चकोर, उपसरपंच) कल्पना रवींद्र अंधोरे (बालविकास प्रकल्प प्रभारी अधिकारी संगमनेर) यांनी या सर्व प्रकरणाची खात्री केली असता, मुलीचे आई- वडील व मुलाच्या आई-वडिलांनी आम्ही साखरपुडा केला आहे. लग्न नंतर करणार आहोत असे सांगितले. तसेच हा विवाह लावणार्या पुरोहिताने देखील हा फक्त साखरपुडा आहे. लग्न केलेले नाही. असे सांगितले. परंतु उपलब्ध पुरावे, फोटो आणि इतर कागदपत्रानुसार ग्रामसेवक अनिल माधव वाणी यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्याने सर्व आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत. बालविवाहामुळे विशेषत: बालिकांच्या आरोग्यसह अनेक प्रश्न गंभीर बनतात. सरकारने आणखी कठोर कायदा करण्याची गरज आहे.