हॉटेल कर्मचाऱ्यांविरुद्ध महिलेची विनयभंगाची तक्रार
युवावार्ता (प्रतिनिधी)
पोलिस प्रशासनाच्या नियमाचे पालन करीत असताना रात्री 10 नंतर आलेल्या ग्राहकांना जेवण नाकारल्याने काही तरूणांनी हॉटेल सेलिब्रेशनमध्ये तोडफोड करत कर्मचारी व मालकास बेदम मारहाण केली होती. पोलिसांच्या उपस्थितीत आरोपींनी प्रचंड धिंगाणा घालत हॉटेलमधील फर्निचरचे हजारो रूपयांचे नुकसान केले. हॉटेल मालक गंभीर जखमी झाले. परंतु पोलिसांनी याबाबत कुठलिही तत्परता दाखवली नाही. उलट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता काही पोलीस कर्मचार्यांनी फिर्यादीस भीती दाखवत पुन्हा पुन्हा विचार करण्याची गळ घातली. मात्र फिर्यादी आपल्या तक्रारीवर ठाम राहिल्याने अखेर चोवीस तासानंतर चार आरोपींवर गुन्हा दाखल केला. यातून पोलीसांचीच भमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. तर या प्रकरणात एका महिलेने हॉटेलमधील चार वेटरविरूध्द विनयभंगाची तक्रार दिली आहे.
सोमवारी 9 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास यातील आरोपी योगेश सुर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे, दिपक रनसुरे हे जेवणासाठी नवीन अकोले रोडवरील हॉटेल सेलिब्रेशन येथे आले होते. परंतु नियमानुसार वेळ जास्त झाल्याने हॉटेलच्या कर्मचार्यांनी त्यांना जेवण देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे या आरोपींचा पारा वाढला. त्यांनी थेट येथील वॉचमन, वेटर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ सुरू केली. यादरम्यान हॉटेल मालक अंकुश अभंग यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता या आरोपींनी फिर्यादीच्या मुलास देखील लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली. त्यांच्या खिशातील 30700 रुपयांची रोख रक्कम देखील या हल्यात काढून घेण्यात आली. तसेच फिर्यादी अंकुश अभंग यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्या गळ्यातील दिड तोळे वजनाची (किंमत 40000) सोन्याची चैन तोडून घेतली. या हल्लेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हॉटेल मधील सामानाची फेकाफेक करत तोडफोड केली. दरम्यान हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. तसेच बघ्याची भूमिका घेणार्या पोलिसांसमोर हा प्रकार घडला. पोलिस स्टेशन जवळ असूनही वाढीव कुमक पेट्रोलिंग करणार्या कर्मचार्यांनी बोलावली नाही. मारहाण झाल्यानंतर पोलिस स्टेशनला फिर्यादी गेला असता तेथेही सदर आरोपींनी शिवीगाळ आणि बाचाबाची केली. दरम्यान या घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेणे गरजेचे होते. परंतु रात्री उशीर झाल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. दुसर्या दिवशी देखील गुन्हा दाखल करून घेतला जात नव्हता. मात्र फिर्यादीने तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरत व सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा देत मागणी लावून धरली त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना अखेर मंगळवारी रात्री 8 वाजता गुन्हा दाखल करावा लागला. सदर आरोपींवर गुन्हा रजि. नं. 853/2023 भादवि कलम 394, 452, 427, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या प्रकरणी एका महिलेने या हॉटेलमधील चार कर्मचार्यांविरूध्द विनयभंगाची तक्रार दाखल करत या प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार तिच्या काही मैत्रिणी या हॉटेलमध्ये अगोदरच जेवणासाठी गेल्या होत्या.त्त्यामुळे रात्री 10.30 फिर्यादी महिला त्याच ठिकाणी जेवणासाठी गेली. मात्र यावेळी तेथील काही कर्मचार्यांनी या महिलेकडे पाहून अश्लिल शेरेबाजी केली त्यामुळे या महिलेने आपला मावसभाऊ दिपक रनसुरे याला याठिकाणी बोलावून घेतले. यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही मित्र आले होते. त्यांनी या वेटरला या प्रकरणाचा जाब विचारला असता त्यातून हा प्रकार घडल्याचे या फिर्यादी महिलेने म्हटले आहे.