मविआला दोन्ही जागा – विखेंना आत्मपरीक्षणाची गरज
विशेष संपादकीय…
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – लोकसभा निवडणुक लागल्यापासून राज्याचे लक्ष अहमदनगर जिल्ह्याकडे लागले होते. कारण या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा दोन ज्येष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. संपूर्ण निवडणूकीत या दोन्ही नेत्यांकडून विजयाचे दावे केले जात होते. मात्र काल मतमोजणीत जिल्ह्यातील मतदारांनी महाआघाडीला विजयी करून या जिल्ह्यात कुणाचे वर्चस्व आहे किंवा कुणाला प्रतिष्ठा आहे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे या निकालानंतर ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र गंभीरपणे आत्मपरीक्षण करावे लागणारा हा निकाल ठरला आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये खरे तर प्रयत्न करूनही ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जिल्ह्यातील दोन्ही पैकी एकही जागा काँग्रेस पक्षाला मिळवून देता आली नाही. परंतु महाविकास आघाडीच्या या दोन्ही जागा निवडणूक आणण्याची जबाबदारी मात्र आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर टाकण्यात आली होती. आ. थोरातांनी शिर्डीवर लक्ष केंद्रित करत असताना दक्षिण नगरमध्ये महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी आपली विशेष यंत्रणा सक्रिय केली. निवडणूक प्रचार, नियोजन ते प्रत्यक्ष सभा, कार्यकर्त्यांशी संवाद, नाराज घटकांची मोटबांधणी यासह विजयासाठी जे जे आवश्यक होते त्यात थोरातांनी लक्ष घातले. इकडे शिर्डी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते सोबत मोठी जबाबदारी डॉ. जयश्री थोरात पहात असल्याने आ. थोरात हे जिल्ह्या बरोबरच राज्यात प्रचार करत करत होते.
दरम्यान काल येथील मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक निकाल लागला. मतमोजणीच्या सात फेर्यांपर्यंत महायुतीला यश मिळत असताना अचानक आठव्या फेरीत भूकंप झाल्यागत नगर दक्षिण आणि शिडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी विजयाकडे आगेकूच केली. शेवटच्या प्रत्येक फेरीनिहाय मताधिक्य वाढू लागले. आणि शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे व दक्षिणेतून निलेश लंके हे महाआघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. मंगळवारी सकाळी नगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. सर्वच वृत्तवाहिन्यांनी अंदाज वर्तविले. ते पाहाता दक्षिणेच्या जागेवर खा. डॉ. सुजय विखे यांचा विजय निश्चित मानत असतानाच सातव्या फेरीअंती सगळ्या अंदाजावर पाणी फिरवित नीलेश लंके या सामान्य व्यक्तीने बलाढ्य अशा विखेंना पराभूत केले. उत्तरेत वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला फटका बसेल, असे चित्र असतानाच भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे या दोन्ही जागेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा घेण्यात आल्या असताना दोन्ही जागां महायुतीने गमावल्या. एकीकडे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली जिल्ह्यातील दहशत मोडून काढू, असे वक्तव्य माजीमंत्री थोरात यांनी केले होते. ते कुठेतरी जिल्ह्यातील निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना थोरात यांनी केलेल्या मदतीमुळे दोन्ही उमेदवारांना मोठा फायदा झाला. आ. बाळासाहेब थोरात यांनी उत्तरेची यंत्रणा दक्षिणेत पाठवून एकप्रकारे लंके यांचा विजय खेचून आणला, असे म्हणावे लागेल. तर उत्तरेची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकली होती. माजी आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात व काँग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन वाकचौरे यांना संगमनेर व अकोले तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात यश मिळविले. त्यामुळे आ. थोरात यांचं राज्यातील वजन वाढले असून आगामी काळात पक्षात देखील ते निर्णायक ठरू शकतात.
दरम्यान राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये गेल्यानंतर व सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात धाक, दडपशाहीचे राजकरण केले. मुळ भाजप कार्यकर्त्यांना दुर ठेवले. पक्षांतर्गत नेत्यांची गळचेपी केली. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यावर कायमच अन्यायाची भुमिका घेतली. दक्षिणेत मोठी कामे केली. मात्र सर्वसामान्यांशी नाळ जोडली नाही. त्यांच्याशी संपर्क करतांना मधे असणारी मोठी साखळी पार करावी लागत होती. चहा पेक्षा किटली गरम अशा कार्यकर्त्या व तथाकथित पीए यांच्यामुळे विखे यांच्याशी नागरीकांचा संपर्क नव्हता. त्यामुळेच या दोन्ही मतदार संघात विखेंनी प्रचंड कष्ट घेऊनही पराभव पत्करावा लागला. या परभवाने त्यांचे राजकीय वजन जिल्ह्यात आणि राज्यात कमी झाले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.