निळवंडे उजव्या कालव्यात अंभोरे येथील तरूणाचा बळी

0
1175

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे अंभोरे – डिग्रस रस्त्याच्या पुलाजवळ निळवंडे उजव्या कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.
याबाबत माहिती अशी की, निळवंडे उजव्या कालव्यातून गेल्या काही दिवसापासून शेतीसाठी पाणी सुरू आहे. अंभोरे येथील या उजव्या कालव्याच्या शेजारी राहत असलेल्या राधाकिसन (अण्णा) विठोबा खेमनर वय वर्ष 43 हे रविवारी पाटाच्या कडेने आपल्या घराकडे जात असताना त्यांचा तोल जाऊन पाटाच्या पाण्यात पडले. हे कोणाचे लक्षात आले नाही. मात्र सोमवारी सकाळी पाटाच्या कडेने चालणार्‍या शेतकर्‍यांनी पाईपला अडकलेला मृतदेह पाहिला असता तात्काळ सरपंच व पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील विनोद साळवे व सरपंच भाऊसाहेब खेमनर यांनी याबाबत तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली. यावेळी पो.नि. देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृत्यूदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदानासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान निळवंडे उजव्या कालव्याच्या पाण्यात पडून पहिला बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here