मालदाड ग्रामस्थांचा रास्तारोको व उपोषणाचा इशारा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नाशिक -पुणे महामार्ग ते मालदाड या रस्त्याची पुर्णत: चाळण झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हडे खिळखिळे झाली तर एसटी महामंडळाने एसटीसेवा बंद केली. अशा या खराब रस्त्यांची दुरूस्ती करावी अशी वारंवार मागणी केल्यानंतर या रस्त्यासाठी 40 लाख रूपये मंजूर करण्यात आले. मात्र या सरकारने या कामाला स्थगिती दिल्याने हा रस्ता आज चालण्यायोग्य सुद्धा राहिला नाही. त्यामुळे अक्रमक झालेल्या मालदाड ग्रामस्थांनी आज महामर्गावर ठिय्या आंदोलन करत सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरूवात करावी अशी मागणी केली. अन्यथा यापुढे रास्तारोको व अमरण उपोषणाचा इशाराही मलादाडचे सरपंच गोरक्षनाथ नवले यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
नाशिक-पुणे मार्ग ते मालदाड, नान्नज, चिंचोली गुरव अशा या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. वरील गावातून अनेक ग्रामस्थ या रस्त्याने संगमनेर सिन्नर या ठिकाणी नियमित ये-जा करत असतात मात्र खराब रस्त्यांमुळे या रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. ग्रामसभेचा ठराव व ग्रामस्थांच्या प्रखर मागणीनंतर डिपीडिसीच्या निधीतून या रस्त्यासाठी 40 लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. मात्र शासनाने तांत्रिक कारण सांगत या कामाला स्थगिती दिली. ही स्थिगिती उठत नसतांना रस्ता आणखी खराब झाला. वाढते अपघात व नागरीकांची गैरसोय यामुळे अक्रमक झालेल्या नागरीकांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.