
नागरिकांचा जीव धोक्यात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मागील दोन वर्षांपासून संगमनेर नगरपालीकेत प्रशासकीयराज आहे. त्यामुळे सर्व विकास कामे व नागरीकांच्या अडचणी सोडविण्याचे काम प्रशासक करत आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेले विकास कामे निकृष्ठ दर्जाचे व अर्धवट स्वरूपात असलेले पहायला मिळतात. दरम्यान शहरातील नविन अकोेले बायपास रोडवरील रस्त्याच्या कडेला टाकण्यात अलेले पेव्हींग ब्लॉक चुकीच्या पद्धतीने व अर्धवट अवस्थेत टाकल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्रीच्यावेळी वाहन चालकांना रस्त्यातील या पेव्हींग ब्लॉकचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा अपघात घडत आहे. मात्र याकडे पालीकेचे साफ दुर्लक्ष आहे.

पालीकेकडून शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कडेला पेव्हींग ब्लॉक टाकण्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. काही ठिकाणी हे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. तर काही ठिकाणी हे पेव्हींग ब्लॉक धुळखात पडून आहे. अनेक ठिकाणी जुनेच पेव्हींग ब्लॉक काढून दुसरीकडे बसविले जात आहे. रस्त्याची लेव्हल न पहाता हे काम केले जात आहे.
असेच काम नवीन अकोले बायपास रोडवर करण्यात आले आहे. रस्त्यालगत पेव्हींग ब्लॉक टाकतांना पाण्याची व रस्त्याची कोणतीही लेव्हल घेतली नसल्याने रस्ता व पेव्हींग ब्लॉकमध्ये मोठी खटकी पडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही खटकी बुजविली नाहीच तर उलट त्या ठिकाणी पेव्हींग ब्लॉक अडवे -तिडवे टाकण्यात आले आहे. अगदी रस्त्याच्या कडेला असल्याने अनेकवेळा दुचाकी वाहनांना त्याचा अडथळा होत आहे तर रात्रीच्यावेळी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिीत अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे पालीकेने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.





















