बससेवा ठप्प – प्रवाशांचे हाल
संगमनेर
मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. अनेक ठिकाणी एसटी बस जाळण्यात आल्याने आंदोलकांचा धसका घेत राज्य परिवहन महामंडळाने बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संगमनेर आगाराने शनिवारपासून सर्व फेऱ्या रद्द करत बस डेपोत उभ्या ठेवल्या होत्या. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तर या संधीचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची लुट केली. आज मात्र काही प्रमाणात गाड्या सोडण्यात सुरवात करण्यात आली आहे.
संगमनेर बस स्थानकात जवळपास ६१ बस कार्यरत आहेत. यामध्ये निम्म्याच्यावर बस नवीन आहेत. आंदोलन चिघळल्याने बसचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली. बाहेरगावी १३ बस असल्याने पोलिसांशी संपर्क साधून त्या सहीसलामत आगारात आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडे केली होती. तालुक्यातील ठिक ठिकाणी गेलेल्या मुक्कामी बस शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन आल्या. मात्र, त्या डेपोत लावण्यात आल्याने परतीच्या प्रवासासाठी विद्यार्थ्यांचे हाल झाले. तासंतास स्थानकात विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. विद्यार्थी व प्रवाशांनी बसची मागणी केली. मात्र, कुठलीही जोखीम पत्करण्यास आगार प्रमुख गुंड तयार नव्हते. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत सूचना येताच बस सुरु करू, असे सांगितले. बस अभावी प्रवाशांना खाजगी वाहनांचा अवलंब करावा लागला. एखादी बस आलीच तर प्रवाशांनी भरू येत होती. जागा पकडण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत होती. मराठा आंदोलनामुळे बस बंद ठेवण्याचे आदेश आहेत. राज्यात दंगली, आंदोलने झाल्यास प्रथम गरिबांची प्रवास वाहिनी असलेल्या एसटी बसची जाळपोळ करण्यात येते. विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होतात. कालच्या घटनेमुळे चालक व वाहक बस बाहेर काढायला तयार नाहीत. घाबरण्यासारखी परिस्थिती आहे. आंदोलकांनी हेवेदावे बाजूला ठेऊन बसचे नुकसान करणे बंद करावे. आपल्या माता, भगिनी प्रवास करतात, याचे भान ठेवावे. एसटीला टार्गेट करू नये असे आवाहन बस आकाराच्या वतीने करण्यात आले आहे.