पोलीसांनी घेतली वेळीच दखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. मोबाईलवर अनेक प्रकारचे बोगस व फेक व्हिडीओ, पोस्ट येत असल्याने व अनेकजण त्याबाबत खातरजमा न करता फॉरवर्ड करत असल्याने अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होते. दरम्यान संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसराबाबत असाच एक चुकीचा मॅसेज फॉरवर्ड झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र शहर पोलीसांनी वेळीच याबाबत दखल घेत घटनास्थळी जाऊन खातरजमा करत कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
संगमनेर शहरातील जोर्वे नाका या परिसरात अज्ञात काही तरूणांनी पाकिस्तानचा झेंडा लावला याचा निषेध करणारे मॅसेज सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागल्याने शहरात संताप व्यक्त केला जाऊ लागला. अनेकजण यावर व्यक्त होते कारवाईची मागणी करू लागले. तर अनेकजण निषेध म्हणून वेगवेगळे पोस्ट करू लागले. याबाबतची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळताच त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी जात त्यांनी खातरजमा केली असता. सदर झेंडा हा पाकिस्तानी झेंडा नसून भारतीय इस्लामी झेंडा असल्याचे आढळून आले. मात्र काही समाजकंठकांनी याला वेगळेच रूप दिल्याने तणाव निर्माण होण्याची परिस्थिती नर्माण झाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी नगरपालीका प्रशासनाच्या मदतीने सदर झेंडा काढून घेतला. त्यानंतर याबाबत कोणीही अफवा पसरू नये, घडलेली घटना ही फेक होती. यापुढे कोणीही बोगस पोस्ट करणारे, अफवा पसरविणार्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा शहर पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर दोन समाजात, धर्मा-धर्मात, जात, देव याबाबत तेढ निर्माण करणारे मॅसेज जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहे. फेक मॅसेज, संतापजनक डीपी यावरून अनेक शहरात दंगल व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व द्वेषातून हे प्रकार घडत असून त्यामुळे समाजात तणाव वाढत आहे. सुज्ञ नागरीकांनी अशा मॅसेज पासून व द्वेषपूर्ण पोस्ट पासून दूर रहावे असे आवाहन पोलीस करत आहे.