संगमनेरच्या या बाळाला हवी आहे तातडीची मदत

0
517

दुर्मिळ आजारात उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

“एक जीव, एक आशा : SMA-1 ग्रस्त श्रीजीतसाठी मदतीची आर्त हाक”

युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी) :
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रहिवासी आणि अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक असलेले अभिषेक चंद्रकांत बोचरे यांचे अवघे काही महिन्यांचे बाळ श्रीजीत एका दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. श्रीजीतला Spinal Muscular Atrophy Type 1 (SMA-1) हा अत्यंत गंभीर अनुवांशिक आजार झालेला असून, या आजारामध्ये शरीरातील स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या पेशी नष्ट होतात आणि त्यामुळे बाळाला श्वास घेणे, गिळणे, हालचाल करणे अशक्य होऊन त्याचा जीव धोक्यात येतो.
या दुर्धर आजारावर सध्या केवळ एकच उपाय उपलब्ध असून तो म्हणजे Zolgensma ही जीन थेरपी – एकाच डोसचा हा उपचार जगातील सर्वात महाग उपचार मानला जातो. या उपचारासाठी सुमारे ₹९ कोटींच्या रकमेची गरज आहे. एवढी मोठी रक्कम एका मध्यमवर्गीय शिक्षक कुटुंबासाठी उभारणे अशक्यप्राय असून त्यांनी समाजाकडे मदतीचे हात जोडले आहेत. उत्तर महाराष्ट्रात – विशेषतः सातारा, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत अशी एकही केस समोर आलेली नाही. त्यामुळे श्रीजीत हा या भागातील पहिलाच रुग्ण असून, वेळेत उपचार मिळणे खूप गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

प्राध्यापक अभिषेक बोचरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘इम्पॅक्ट गुरु’ या क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मवरून निधी संकलन सुरू केले असून, अनेकांनी आतापर्यंत त्यास प्रतिसाद दिला आहे. तथापि, लक्ष्य गाठण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. supportshreejit6@yesbankltd या UPI आयडीवर थेट मदत करता येते, तसेच www.impactguru.com/fundraiser/help-shreejit-bochare या लिंकवरूनही दान करता येते.
सामाजिक संस्था, उद्योग समूह, CSR फंड, राजकीय नेते, समाजसेवक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रीजीतसाठी पुढे यावे, असे आवाहन बोचरे कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे. एक बाळ वाचवण्याची ही संधी आहे – आपली छोटीशी मदत श्रीजीतसाठी जीवनदान ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here