दोघांना अटक, सुमारे २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरालगत असलेल्या गोल्डन परिसरातील लक्ष्मीनगर, काशिआई मंदिराजवळ असणार्या एका इमारतीमध्ये गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी छापा टाकत दोन जणांना अटक केली. या कारवाईत सुमारे 24 हजार 925 रुपयांचा गांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मंगळवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास लक्ष्मीनगर परिसरातील कशिआई देवी मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना गांजाची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, हेड कॉन्स्टेबल सातपुते, पोलीस हवालदार खुळे, पांडे, आगलावे, मुंडे व नागरे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यात मुन्ना अब्बास शेख लक्ष्मीनगर आणि संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर (रा. संजय गांधी नगर, संगमनेर) यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी 965 ग्रॅम वजनाचा काळपट व हिरवट रंगाचा, उग्र वास येणारा सुक्या गांजाचा साठा जप्त केला. त्याची किंमत सुमारे 24 हजार 125 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच 32 ग्रॅम वजनाचा गांजा (सातपुड्यात ठेवलेला) जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 800 रुपये आहे. एकूण 24 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर मच्छिंद्र नागरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 155/2026 अन्वये अमली पदार्थ व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क) सह 22(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत.

दरम्यान, याच परिसरात काही दिवसांपूर्वीही शहर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा जप्त केला होता. तसेच संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी परिसरातही अलीकडे मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आला होता. त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुन्हा शहरात गांजाचा साठा आढळल्याने गांजाच्या तस्करीचे जाळे किती खोलवर रुजले आहे, हे अधोरेखित होत आहे. शहरात गांजा बरोबरच आमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट असल्याचे पुढे आले होते. पोलीसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने अजूनही शहरात गांजा, दारू मटका, गुटखा, अमली पदार्थ याची तस्करी होत आहे. कत्तलखान्यावर जेसीबी चालवला मात्र कत्तलखाने पुर्णपणे बंद होतील याची कोणतीही शास्वती नाही.
शहरात वारंवार उघड होत असलेल्या अशा कारवायांमुळे अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





















