सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
उंबरी बाळापूरमध्ये घडली होती घटना
संगमनेर (दैनिक युवावार्ता)- संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशनमध्ये उंबरी बाळापूर ग्रामपंचायत सरपंच सौ. अर्चना सुभाष भुसाळ व ग्रामसेवक संग्राम चांडे आणि संजय शिखरे यांच्यावर कै. पंकज अरुण कांबळे या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दि. 22/12/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 2020/21 च्या कालावधीत उंबरी बाळापूर दत्तनगर भागात विद्युतीकरण या आशयाखाली ग्रामपंचायत अंतर्गत स्ट्रीटलाइट टाकण्यात आली होती. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या कामासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले असावे. त्यामुळेच त्याठिकाणी वापरण्यात आलेल्या केबल वायरचे वरील आवरण खराब होऊन विद्युत प्रवाह करणारी वायर उघडी पडली होती. त्यामुळेच पंकज कांबळे ही व्यक्ती विजेचा शॉक लागून मरण पावली, असे मुलाचे चुलते शरद पुंजा कांबळे यांचे मत आहे.
दरम्यान, कै. पंकज अरुण कांबळे हा तरुण गरीब कुटुंबातील असून तो मजूर म्हणून ट्रॅक्टरवर माती व शेणखत ट्रॉलीत भरण्यासाठी जात होता. त्यादिवशी, दि. 28/11/2024 रोजी, ट्रॅक्टरवर इतर मजुरांसोबत संजय शिखरे यांच्या वस्तीकडे शेणखत भरण्यासाठीच गेला होता.हे काम करत असताना उंबरी बाळापूर ग्रामपंचायतच्या स्ट्रीटलाइटच्या केबलला त्याच्या हातातील लोखंडी फावड्याचा स्पर्श होऊन त्याला विजेचा शॉक लागून तो मरण पावला. दरम्यान, संजय शिखरे यांनी यापूर्वीच दोन-तीन वेळेस सरपंच सौ. अर्चना सुभाष भुसाळ यांना प्रत्यक्ष भेटून सदरची केबल वायर बदलण्याबाबत विनंती केली होती. तसेच फोन करून तक्रार देखील केली होती.मात्र सरपंच व ग्रामसेवक यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या कामातील बेजबाबदारपणा यामुळे उघड झाला आहे. त्याप्रमाणे, उंबरी फीडर गावासाठी नेमलेले दोन्ही वायरमन जबाबदार आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे संपूर्ण सदस्य देखील जबाबदार आहेत, असेच म्हणावे लागेल. कारण स्ट्रीटलाइटच्या केबलमध्ये चोवीस तास प्रवाह चालूच राहतो आणि सर्व सदस्य गावातीलच असतात. त्यांच्या निदर्शनास या बाबी येतात, परंतु तेही दुर्लक्ष करतात. वायरमन दुर्लक्ष करतात.त्यामुळेच या घटनेत सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह वायरमन, उपसरपंच, सदस्य हे सर्वच सामूहिकरीत्या जबाबदार असल्याने इतरांसह यांनाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी फिर्यादी शरद पुंजा कांबळे यांनी केली आहे. सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.