
विरोधक मात्र दर पाच वर्षाने शेजार्यांच्या भरवशावर वेगवेगळा चेहरा घेऊन समोर येतात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – कधी नव्हे ती संगमनेर विधानसभेची निवडणूक एव्हढी गाजत आहे. आ. थोरात विरोधात अमोल खताळ उमेदवार असले तरी खरी लढत ही थोरात विरूद्ध विखे अशीच होतांना दिसत आहे. परंतु अनेक वर्षे थोरातांनी संगमनेकरांसाठी काम केले, विरोधक मात्र दर पाच वर्षाने शेजार्यांच्या भरवशावर वेगवेगळा चेहरा घेऊन समोर येतात. आणि नंतर परागंदा होतात. यावेळी विरोधकांनी आरोपांची राळ उठवली, खालच्या पातळीवर जाऊन आरोप, टिका केली परंतु येथील मतदार सुज्ञ आहे. भाषणात टाळ्या मिळाल्या पण मतांचे राशन मात्र नेहमीप्रमाणे मिळणार नसल्याचे दिसत असून प्रचाराचा जोरदार थरार दिसला. आता येत्या 23 तारखेला कुणाचा टांगा पलटी होणार हे कळणार आहे.
जिल्ह्यासह राज्यात राजकीय वर्चस्वासाठी संगमनेर- शिर्डी मतदार संघात नेहमीच राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. राजकारणात थोरात हे सिनियर नेते आहेत. तोच मान त्यांना राज्यात देखील मिळत आहे. मात्र या वर्चस्वासाठी, सत्तासंघर्ष, सुंदोपसुंदी, सत्तासुंदरीसाठी हा संघर्ष सुरू आहे. यातून जनतेचे हित साधले जातेच असे नाही. उलट नुकसान जास्त होते. संगमनेरात स्थानिक राजकारण, स्थानिक विरोध ठिक आहे. परंतू येथील काही जण शेजार्यांच्या रसदवर तालुक्यातच सत्तासंघर्ष घडवून आणत आहे. सत्तेचा दुरोपयोग करून चांगल्या कामाला विरोध करणे, जनहिताचे प्रकल्प रखडविणे, गैरप्रकार करणे असे उद्योग विरोधकांकडून होतांना पहायला मिळतात. भ्रष्टाचार व हदशतीचा सतत उद्घोष करतांना हेच या प्रवृत्तींना पाठिशी घालत असल्याचे मतदारांना दिसत आहे. भुखंडाचे श्रीखंड कोण खात आहे. याकडेही जनतेचे लक्ष आहे. येथील मतदार साक्षर व सुज्ञ आहे. आपले हित कशात आहे याची चांगली जाण त्यांना आहे. येथील राजकारण, अर्थकारण चांगले की, शेजारी चांगले याचीही पुरेपूर माहिती त्यांना आहे. आपल्या अडचणींना जवळचा मदत करेल, धाऊन येईल की, दुरचा याचाही विचार मतदार यानिमित्ताने करणार आहे. 20 तारखेला मतदान आहे यावेळी सारासार विचार करून मतदार योग्य उमेदवारास मतदान करून आमदाराची निवड करतील.