रस्त्याचे काम करताना हलगर्जीपणा नडला

0
1106

इसमाच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
रस्त्याचे काम घेतल्यानंतर ते करत असताना गव्हर्नमेंट कॉन्ट्रक्टरने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही. सुमारे सात ते आठ फुट खोल मोरीचे काम करताना त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुचना फलक किंवा दुर्घटना टाळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा लावण्यात आला नाही. त्यामुळे हा खड्डा लक्षात न आल्याने एका दुचाकीस्वाराचा मोरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रक्टरवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मयत राघु गजाबा कडनर यांचा मुलगा शुभम राघु कडनर रा. अंभोरे ता. संगमनेर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत त्यांनी लिहले आहे की, तालुक्यातील अंभोरे गावातून पिंपरणे ते कोळवाडे चौफुली रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चालू आहे. सदर रस्त्याचे काम जो गर्व्हमेंट कॉन्ट्रक्टर करत आहे त्याच रस्त्यावर कोळवाडे शिवेवर अंभोरे गावात माझे घर आहे. दि. 28/04/2024 रोजी रात्री मोटार सायकलवरून सदर रस्त्याने घरी जात असतांना पुलाचे कामाच्या ठिकाणी रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे सुचना फलक किंवा काही एक निशाणी लावलेली नव्हती. तसेच रस्त्यावर काँक्रीट मळण्याचे मशिन लावलेले होते. माझी गाडी सदर रस्त्याने जात असतांना मातीचे ढिगावरुन घसरुन काम चालू असलेल्या खड्ड्यात पडली. त्यात माझ्या मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मी मोटार सायकल सोडून पायी चालत घरी गेलो होतो. त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी 6 वा. चे सुमारास माझे वडील राघु गजाबा कडनर त्यांची बजाज प्लॅटिना मोटार सायकल क्र.एम.एच.17 सी डब्ल्यु 4697 वरून हळदीचे कार्यक्रमानिमित्त संगमनेर येथे गेले होते व ते उशीरा घरी येणार होते.


त्यामुळे आम्ही सर्व झोपी गेलो होतो. त्यांनतर दुसरे दिवशी दि.29/04/2024 रोजी सकाळी वडीलांच्या मित्रांकडे चौकशी केली असता कळाले की वडील रात्री 11/30 वा. चे सुमारास कार्यक्रमावरुन घरी आले होते. त्यांनतर मी आजुबाजुला शोध घेतला परंतु वडील कुठेही दिसले नाही. वडीलांचा शोध घेत असतांना समजले की वडिलांचा अपघात झाला आहे. घटनास्थळी जाऊन पाहीले असता वडील रस्त्यावर मोरीचे काम चालु असलेल्या ठिकाणी पडलेले होते. त्यांचे तोंडातून व नाकातुन रक्त आलेले होते. त्यांची मोटार सायकल बाजूला पडलेली होती. तसेच माझी मोटार सायकल देखील त्याच खड्ड्यात पडलेली होती. वडीलांना पुढील उपचाराकरीता ग्रामिण रुग्णालय घुलेवाडी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत म्हणून घोषित केले.
सर्व विधी पार पडल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानूसार दि. 28/04/2024 रोजी रात्री 11/30 वा. चे सुमारास फिर्यादीचे वडील राघु गजाबा कडनर, वय 50 वर्षे रा. अंभोरे हे मोटार सायकल संगमनेर येथून पिंपरणे कोळवाडे रोडने अंभोरे येथे घरी येत असतांना पांडु वर्पे यांचे घराजवळील रस्तावरील मोरीचे काम चालू असलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम घेतलेले कॉन्ट्रक्टरने घेतलेल्या रस्त्याचे काम करत असतांना सदर रस्त्यात काम चालु असलेल्या ठिकाणी काम चालु असलेबाबत कोणत्याही प्रकारचे सुरक्षेच्या दृष्टीने सावधानतेचे कोणतेही बोर्ड, खुणा, रिफलेक्टर, लाल निशाण किंवा रेबीन, दुभाजक रस्त्याची पाटी व त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची खबरदारीचे उपाय न करता निष्काळजीपणे रस्त्याचे काम चालु ठेवले होते.
रस्त्यावरुन जाणार्‍या माणसाचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असताना, हयगयीने काम चालु असलेल्या रस्त्यात मोरीचे काम करण्यासाठी अंदाजे 7 ते 8 फुटाचे खोल खड्डे खोदुन मोरीचे काम करित होते. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच माझे वडिलांचे मोटार सायकलचा अपघात होवुन त्यामध्येच वडिलांना जबर दुखापत होवुन ते मयत झाले आहेत. त्यांचे मृत्यूस रस्त्याचे ठेकेदारच जबाबदार आहेत म्हणून ठेकेदार विरुध्द फिर्याद देण्यात आली असून त्यानूसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here