म्हाळुंगी नदीवरील आधीच पडलेला एक पुल अजून उभा राहिलेला नसताना आता दुसरा पुलही खचल्याने नागरीकांमध्ये संताप
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – भंडारदरा, निळवंडे पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवससात जोरदार पाऊस कोसळला होता. अजूनही अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहे. या पावसामुळे प्रवरा नदिला मोठा पुर आला होता. या पुरामुळे संगमनेर शहरातील प्रवरेच्या छोट्या पुलाचा मोठा भराव वाहून गेला होता. तर आता या पुलाची एक बाजू खचली असून हा पुल सध्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
म्हाळुंगी नदीवरील आधीच पडलेला एक पुल अजून उभा राहिलेला नसताना आता दुसरा पुलही खचल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
संगमनेर खुर्द आणि संगमनेर शहराला चंद्रशेखर चौक या जवळच्या मार्गे जोडणारा हा महत्त्वाचा पुल आहे. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात सध्या अधूनमधून पाऊस तांडव करत आहे. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणातून कमीजास्त प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने प्रवरेचा पुर कायम आहे. या पुरामुळे पुलाच्या एका बाजूचा भराव खचला होता तर आता पुलाचा एक भाग देखील खचला असून पुलाला धोका निर्माण झाला आहे.
काल काही वाहनचालकांना पुल खचल्याचे अढळून आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रथम नगरपालीका प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी येथील वाहतूक बंद करत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सदर पुल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने अधिकार्यांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी येथील वाहतूक बंद केली आहे. पाणी ओसरल्यानंतर या पुलाची तपासणी केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हंटले आहे. सदर पुल हा अवघ्या काही वर्षांचाच आहे.