
संगमनेरात फक्त ठेकेदार पोसण्याचे काम होते – डॉ. विखे
युवावार्ता(प्रतिनिधी) –
संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. येथील सहकार शिक्षण समाजकारण हे आदर्शवत आहे. मात्र हे बिघडवण्यासाठी आणि तरुणांची डोके भडकवण्यासाठी काही लोक बाहेरून येऊन भाषण करत आहेत. दादागिरी आणि दडपशाही काय असते की त्यांच्या भाषणातून कळत आहे. हा संगमनेर तालुका असून दादागिरी करत नाही आणि कुणाची दादागिरी सहन सुद्धा करत नाही असे सांगताना नगर मनमाड रस्ता ही त्यांची निष्क्रियतेची मोठी ओळख असल्याची टीका युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.
चिखली ,धांदरफळ, वडगाव लांडगा, जवळेकडलग, राजापूर येथे झालेल्या युवा संवाद यात्रेत त्या बोलत होत्या यावेळी समवेत मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलग, विष्णुपंत रहाटळ, विनोद हासे, श्रीराम पवार, दत्तू कोकणे, आनंद वर्पे बाळासाहेब कानवडे, प्रदीप हासे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व गावांमध्ये या युवा संवाद यात्रेचे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत झाले.
याप्रसंगी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असलेला तालुका आहे. मोठ्या कष्टातून हा तालुका उभा राहिला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली इथला सहकार शिक्षण ग्रामीण विकास ही राज्यासाठी आदर्शवत आहे. सुसंस्कृत राजकारण हे संगमनेर तालुक्याची वैशिष्ट्य आहे. तरुणांची चांगली पिढी घडवण्यासाठी काम केले जात आहे .मात्र बाहेरून येणारे लोक येथे माथी भडकवत आहेत. दादागिरी आणि दडपशाही काय असते त्यांच्या भाषणातून कळत आहे. नगर दक्षिणेमधून त्यांना पराभूत व्हावे लागले ते निष्क्रियतेमुळेच गचक्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेला नगर मनमाड रस्ता हे निष्क्रियतेचे मोठे उदाहरण आहे.
राहता तालुक्यातील सर्व सहकारी संस्था अडचणीत आहे. ज्यांनी अनेक संस्था बंद पाडल्या ते आता विकासाच्या गप्पा करत आहेत. आ. थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले ज्यांनी या कामात अडचणी निर्माण केल्या ते या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहे. आपल्याला संस्कृत राजकारणाची परंपरा जपत पुढे जायचे आहे. तरुणांना भडकवून जातीभेद करून दादागिरी निर्माण करू पाहणार्यांना सर्वांनी वेळीच रोखायचे आहे.
कुणी एक मारली तर दोन मारा हे हे सांगणे म्हणजे आपण कुठल्या लोकांचे भाषण ऐकत आहोत असा प्रश्न जनतेला पडला आहे. कारण असे हाणामारी आणि दडपशाहीचे राजकारण संगमनेर तालुक्याला माहीत नाही. त्यांचे राजकारण दोन चार भाषणांवरून जनतेला कळले आहे आणि एक महिन्यानंतर ही पुन्हा कोणाला दिसणारे नाही अशी टीका डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आह
संगमनेरात फक्त ठेकेदार पोसण्याचे काम होते – डॉ. विखे

संगमनेर तालुक्याची संस्कृती आता दडपशाही व गुंडगिरीमध्ये अडकली आहे. ठराविक कुटुंबाचे भले आणि ठेकेदार पोसण्यासाठीच विकास सुरू आहे. युवा संवाद यात्रा काढतात पण तुमच्यासोबत युवा राहिला आहे का? असा थेट सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.
तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे आयोजित युवा संकल्प मेळाव्यात बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आ. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपध्दतीवर हल्लाबोल केला. येथील जनता 40 वर्षे एकच भाषण कसे ऐकते? असा उपरोधीक सवाल करुन, तालुका आमचे कुटुंब असल्याची भाषा केवळ खोटी सहानुभूती मिळविण्यासाठी केली जाते,
असा टोलाही त्यांनी लगावला. आमदारांनी तालुक्यातील जी गावे दत्तक घेतली, त्या गावांना एक रुपयांचा निधी त्यांनी दिला नाही. याच गावात मात्र विखे पाटील यांना मानणारे सरपंच निवडून येतात. आता त्यांच्याकडे दत्तक जाऊ नका. कारण त्यांच्या कुटुंबात जागा नाही, येथे फक्त ठेकेदारांना संधी आहे. विखे पाटील परिवार तुमच्यासाठी समर्थ आहे. आमच्या गाडीत ठेकेदारांना नव्हे तर कार्यकर्त्यांना संधी आहे. अंगणवाडीच्या कामात सुध्दा पैसे खाणारे ठेकेदार यांनी निर्माण केले.
याचे उत्तर आता जनता मागत आहे. या तालुक्यात फक्त संस्कृतीवर भाषणं सुरू होतात. मात्र आमची संस्कृती जमीन हडपण्याची नाही. मात्र महसूल मंत्री ना. विखे पाटील यांनी साडे तीनशे कोटी रुपयांच्या जमिनी या अनेक गावांच्या विकासासाठी आणि औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी दिल्या.
निळवंडे होऊ देत नाही, असे अनेक आरोप विखे पाटील परिवारावर झाले. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांना बदनाम केले गेले. परंतु ’भगवान के घर देर है अंधेर नहीं’. निळवंड्याचे पाणी मंत्री ना. विखे पाटील यांनीच आणून दाखविले. यासाठी ज्येष्ठ नेते पिचड यांचेही मोठे सहकार्य मिळाले. त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. कधीतरी खरें बोलायला शिका, केवळ फ्लेक्स लावून स्वतःचा उदोउदो करून घेणारी ही माणसं शेतकर्याला, पाणी देवू शकत नाही. आमच्या तालुक्यातआम्ही स्वतःच्या खिशातून पैसे घालून शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविले. परिवर्तन करण्याची हीच संधी आहे. महायुती सरकारने अनेक योजना दिल्या आहेत, त्याचा लाभ सर्वांनाच मिळाला आहे. येथील दूध संघाला सुध्दा दूध अनुदानापोटी 14 कोटी रुपये दिले. येणार्या काळात यांच्या दडपशाहीची संस्कृती उखडून टाकण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. निर्धार करा, या तालुक्याचा यंदाचा आमदार हा महायुतीचाच करायचा आहे, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी रामभाऊ राहाणे, काशिनाथ पावसे, संदीप देशमुख यांचीही भाषणं झाली.





















