मतदारांची शक्ती करेल संगमनेर – शिर्डीची दहशत मुक्ती

0
712

संगमनेर, शिर्डी मतदारसंघात आजी -माजी महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. दरम्यान संगमनेर, शिर्डी मतदारसंघात आजी -माजी महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर दहशतीच्या आरोपांची राळ उडवली जात असून याच मुद्यावर या दोन्ही मतदारसंघांत निवडणूक गाजत आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघांत कुणाची दहशत आहे आणि कोण दहशत पसरवीत आहे हे सुज्ञ मतदार ओळखून आहे. संगमनेरात विकासाचे आणि सहमतीचे राजकारण मागील अनेक दशके सुरू असताना विकास आणि इतर प्रश्‍नावर चर्चा करण्यापेक्षा शेजार्‍यांनी आणि त्यांच्या प्यादे ठरलेल्या उमेदवाराने संगमनेरातील दहशत मोडून काढू असे आव्हान दिल्याने या निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. परंतु शिर्डी आणि संगमनेरातील सुज्ञ मतदार नक्की जाणून आहेत की दहशत कोण करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील सुज्ञ मतदारच मतदानाच्या शक्तीतून दहशतीची मुक्ती करतील असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.


लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्याच्या एका मतांमध्ये सत्ता पालट करण्याची क्षमता असते. परंतु त्याच मतदाराला गृहीत धरून हे राजकारणी आपल्या सत्तेच्या पोळ्या भाजत असतात. राज्यात अनेक मतदार संघात राजकीय नेत्यांची प्रचंड दहशत असते. दहशत व दडपशाहीतून निवडणूका जिंकल्या जातात. याची अनेक उदाहरणे समोर आली आहे. त्यामानाने नगर जिल्ह्यात अशा राजकीय दहशतीचे प्रमाण फार कमी आहे. परंतू गेल्या काही दिवसापासून संगमनेर व शिर्डी विधानसभा मतदार संघात दहशतीचे आरोप-प्रत्यारोप दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. आपला मतदारसंघ सुरक्षित व आबाधित ठेवण्यासाठी एकमेकांवर दहशतीचे आरोप करणे व आपल्याच मतदारांना भयभीत करणे हा प्रकार आता नव्याने सर्रास सुरू आहे.


दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात अनेक वर्षे मंत्री म्हणून राहिले आहे. परंतू या मंत्रीपदाच्या काळात त्यांच्यावर दहशत पसरविण्याचे, फोडाफोडीचे किंवा विरोधकांना त्रास देण्याचे आरोप फारसे झाले नाहीत. एकवेळ विरोधकांना काही प्रसंगी सहकार्य केले नसेल मात्र त्यांच्यावर सुडापोटी आरोप, गुन्हे दाखल केले नाहीत. बदनाम ठेकेदार, कार्यकर्त्यांमुळे थोरात अनेकवेळा अडचणीत आले मात्र अशा ठेकेदारांना त्यांनी फारसे पाठीशी घातले नाही. हिच परिस्थिती उलट दिशेने पहायला मिळते. महसूलमंत्री म्हणून विखे पाटील यांनी अनेक चांगले व धाडसी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला परंतू वाळू वितरण धोरणासारखे काही निर्णय यशस्वी होऊ शकले नाहीत. अनेकवेळा विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी सुडबुद्धीने कारवाई केल्याचे या दोन्ही मतदार संघात दिसत आहे. महसूलमंत्रीपद हे राज्याचे असतांना व गौण खनिज धोरण राज्यात एकसमान असतांना संगमनेरात मात्र वेगळेच धोरण पहायला मिळाले. प्रवरेच्या एका पट्ट्यात वाळू उपश्याला पुर्ण बंदी तर दुसर्‍या पट्ट्यात खुलेआम सवलत असल्याचे दिसून येते. केवळ थोरातांचे समर्थक आहेत म्हणून अनेक स्टोन क्रशर चालकांना, वाळू ठेकेदारांना कोट्यावधी रूपयाचे दंड ठोठावण्यात आले. दबाव टाकून किंवा भिती दाखवून अनेक कार्यकर्ते फोडण्यात आले. हिच परिस्थिती शिर्डी मतदार संघातील अनेक गावांमध्ये मतदारांना स्पष्ट दिसते.


धांदरफळ येथे महायुतीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर वसंत देशमुख यांनी खालच्या पातळीवर जाऊन आरोप केल्यानंतर तणाव निर्माण झाला. यातून काही अघटीत घटना घडल्या. याचे समर्थन कुणीही करत नाही. मात्र त्यात ज्या कार्यकर्त्यांचे नावे गोवले गेले व गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातील काही कार्यकर्ते तर घटनास्थळी सुद्धा नव्हते. काही कार्यकर्ते तर महाराष्ट्रात देखील नव्हते. मग ही नावे कुणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आली. हा प्रकार म्हणजे एकप्रकारची दहशतच आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे परंतू केवळ द्वेषापोटी कार्यकर्त्यांचे आयुष्य बरबाद करणे चुकीचे आहे. थोरात-विखे हा राजकीय वैर सर्वश्रुत आहे. परंतू गेल्या काही काळापासून हे वैर वैयक्तीक पातळीवर आले आहे. हे या दोन्ही मतदार संघासाठी व विकासासाठी धोकादायक आहे. राजकीय टिका-टिप्पणी करण्यापर्यंत मर्यादित असलेले हे वैर आता टोकाच्या द्वेषाचे बनत आहे.


कोणत्याही मतदार संघातील मतदार जागृत व सुज्ञ असेल तर आर्थिक प्रलोभणास दात देत नाही. तसेच मतदानही योग्य उमेदवारास करतो. संगमनेर मतदार संघातील 28 गावे विधानसभा मतदार संघासाठी शिर्डी मतदार संघात समाविष्ठ केलेली आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ही गावे बाळासाहेब थोरातांचे नेतृत्वाखाली असतात. विखे आणि थोरात घराण्यांची राजकीय वाटचाल, सत्तास्पर्धा आणि तिसर्‍या पिढीतील सहभाग मतदार अनुभवीत आहेत. विखेंनी शिर्डी मतदार संघ अबाधित राखण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी भक्कम केली असून संगमनेरमध्येही आ. थोरातांनी सहकारातून राजयकीय शक्ती वृद्धींगत केली आहे. कुणाची दहशत असेल तर ती कार्यकर्त्या व्यतिरिक्त असणार्‍या विरोधकांनाच जाणवेल. परंतू स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दहशतीचे आरोप करणार्‍या पुढार्‍यांचे मतदारांना हसू येते. त्यामुळे मतदार आपल्या मतदानाच्या शक्तीद्वारे तथाकथित दहशतीला मुक्ती देतील असेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here