
गावाचं नावच बदललं! नाशिक-पुणे महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे संभ्रम वाढला
संगमनेर (संजय आहिरे) –सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा गावाचा उल्लेख महामार्गावर लावलेल्या दिशादर्शक फलकावर चुकीच्या पद्धतीने ‘बोटगाव’ असा करण्यात आला आहे. या चुकीमुळे केवळ स्थानिक ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला नाही, तर नवीन वाटसरूंमध्येही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी बांधकाम विभागाने दिशादर्शक फलक लावले आहेत. याच दरम्यान, बोटा गावासाठी लावण्यात आलेल्या फलकावर गावाचं मूळ नावच बदलून ‘बोटगाव’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, ‘बोटगाव’ नावाचं गाव संगमनेर तालुक्यात नाहीच! त्यामुळे स्थानिक ग्रामस्थच बुचकळ्यात पडले आहेत. “आपल्या तालुक्यात ‘बोटगाव’ नावाचं गाव आहे का?” असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारताना दिसत आहे.हा प्रकार केवळ सामान्य चूक म्हणून सोडून देण्यासारखा नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा ढिसाळपणा आणि गलथानपणा स्पष्टपणे समोर आला आहे. चुकीचे फलक लावणे, चुकीची माहिती देणे हे प्रकार यापूर्वीही अनेक ठिकाणी घडले आहेत. मात्र आता गावाच्या नावातच बदल करून फलक लावला गेल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ही चूक केवळ स्थानिक नागरिकांपुरती मर्यादित राहणार नाही. महामार्गावरून प्रवास करणारे नवीन वाटसरू चुकीच्या माहितीमुळे दिशाभूल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना चुकीच्या गावाचा फलक पाहून मार्गच चुकण्याचा धोका आहे, ज्याचा थेट परिणाम प्रवासाच्या सुरक्षिततेवरही होऊ शकतो.यामुळे ग्रामस्थांसह प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तात्काळ चुकीचा फलक बदलून योग्य माहिती असलेला नवीन फलक लावण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे.