मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण समारंभ
संगमनेर ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास मंत्रालयातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अभियंता पुरस्कार अकोले तालुक्यातील अंघोळ गावचे सुपुत्र विजय कारभारी चौधरी यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाचे आवर सचिव अजय सिंग पाटील मंत्रालय मुंबई यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज गुरुवार, दिनांक २० रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, नरिमन पॉईंट, मुंबई येथे सकाळी १० वाजता सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव म्हणून कार्यरत असलेले विजय चौधरी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा निरसिद्ध झाल्यानंतर शासन देयक्षेत्रापोटी सन 2019 ते 2023 या कालावधीत योजना धारकांकडून सुमारे अकराशे कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. संचालक नगर रचना व अधिनस्त कार्यालयांसाठी सुमारे 1199 पदांचा सुधारित आकृतीबंध त्यांनी निश्चित केला तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचारी व कार्यालयांसाठी पुरस्काराची योजना ही तयार केली. मुंबई येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी प्रशासकीय व अर्थसंकल्पीय बाबी विहित मर्यादेत त्यांनी पूर्ण केलेले आहेत मुंबई मेट्रो लाईन 3 करिता सुधारित प्रशासकीय मान्यता तसेच आरे कार विषयीच्या प्रशासकीय व माननीय न्यायालयीन प्रकरणांच्या बाबीही त्यांनी विहित वेळेत पूर्ण केल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.